
गडचिरोली : राजधानी नवी दिल्लीत सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गडचिरोलीत निर्मित उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे. गडचिरोलीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत सुरू असलेल्या उद्योगांच्या उत्पादनांचा स्टॉल दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
या प्रदर्शनात संधी मिळालेल्या गडचिरोलीच्या उत्पादनांमध्ये दोन स्थानिक उद्योगांच्या उत्पादनांचा समावेश आहे. त्यात सतलक इंडस्ट्रिजच्या आहार नमकीन उत्पादनांसह फ्रेशल अॅग्रो फॅारेस्ट्रीच्या मोहामृताचा समावेश आहे.
या स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार मेळाव्यात स्थान मिळणे ही गडचिरोली जिल्ह्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब ठरली आहे.
या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांची ओळख व्यापक स्तरावर निर्माण करण्याची, नवीन बाजारपेठांशी जोडले जाण्याची आणि व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडचिरोलीच्या स्थानिक उत्पादनांची दिल्लीपर्यंत झेप ही जिल्ह्याच्या उद्योजकतेसाठी गौरवास्पद कामगिरी आहे.
































