गडचिरोली : शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे, खताचा काळाबाजार करणे, तसेच शासकीय ई-पॉस प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्राचे संचालक भास्कर महादेव नाकाडे यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी विभागाच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सांगितले.
कृषी विभाग गडचिरोलीच्या जिल्हा भरारी पथकाने व तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांनी दिनांक 8 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान कृषी केंद्रांची संयुक्त तपासणी केली. या तपासणीत नाकाडे कृषी केंद्रात गंभीर अनियमितता उघडकीस आली. शेतकऱ्यांच्या नावे ई-पॉस मशीनवर सुमारे 1.5 मेट्रिक टन डीएपी खत विक्री दाखवण्यात आली असली तरी संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात इतक्या प्रमाणात खत घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून बोगस विक्रीचे प्रकार उघड झाले आहे.
तसेच आय.एफ.एम.एस. (iFMS) पोर्टलवरील नोंदींच्या पडताळणीत सुमारे 25 मेट्रिक टन अनुदानित खताची विक्री जिल्ह्याबाहेर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय दुकानातील साठा नोंदवही (एन फॉर्म) अद्ययावत नसणे, प्रत्यक्ष साठा व नोंदींमध्ये मोठी तफावत आढळणे आणि शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे असे गंभीर प्रकारही तपासणीत समोर आले.
असमाधानकारक खुलास्यानंतर फिर्याद
या प्रकरणी कृषी विभागाने 9 एप्रिल 2026 रोजी संबंधित संचालकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खत निरीक्षक शितल खोबरागडे यांनी देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, तसेच खत (नियंत्रण) आदेश, 1985 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
दरम्यान, कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना स्पष्ट इशारा देत खत विक्रीमध्ये पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताचा काळाबाजार किंवा ई-पॉस प्रणालीत कोणत्याही प्रकारची छेडछाड आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
































