चामोर्शी : रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा मंजेगाव, मछली, श्यामनगर, सिमुलतला, मक्केपल्ली, चापलवाडा, विकासपल्ली, रेगडी, माडेआमगाव, पोतेपल्ली व लगतच्या अनेक गावातील नागरिकांना पंचायत समितीच्या वतीने घरकुल मिळालेले आहेत. परंतु राज्य सरकारच्या वतीने अजूनपर्यंत या भागातील नागरिकांना रेतीघाट उपलब्ध करून न दिल्याने येथील घरकुलांचे काम सुरू झालेले नाही. या भागातील नागरिकांकरिता निदान आमगाव घाट, अथवा साखरदेव घाट तात्काळ सुरू करून गोरगरीब नागरिकांना घरकुलाकरिता रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांनी केली आहे.
डॅा.खुणे यांनी यासंदर्भात तहसीलदारांना एक निवेदनही सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत तहसीलदार घारुडे यांनी साखरदेव घाट वनविभागाच्या अधीन असल्याने वनपरवानगी मिळाल्याशिवाय सदर घाट सुरू करने शक्य नसल्याचे, तसेच चामोर्शी तालुक्यातील आमगाव घाट लिलावात दिल्यामुळे सदर घाट जोपर्यंत कंत्राटदार आपल्या हाती घेत नाही, तोपर्यंत 10 टक्के रेती नागरिकांना देणे शक्य नाही, असेही सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील घरकुल बांधकामासाठी रेतीचा ग्रहण प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या तातडीने न सोडविल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
अनेक नागरिकांनी डॉ.प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी मंजेगाव येथील माजी सरपंच रमेश लेकलवार, बोमकंटीवार पाटील, राजू सातपुते, संदीप भोवरे, पलाश घरामी, सुमेन विस्वास यांच्यासह मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, संघटन नेते प्रवीण गेडाम, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































