Home क्राईम नोकरीचे आमिष देऊन 2 कोटी रुपये लुबाडणारा आरोपी कंगाल

नोकरीचे आमिष देऊन 2 कोटी रुपये लुबाडणारा आरोपी कंगाल

ऑनलाईन गेमिंगवर उडवले पैसे !

गडचिरोली : शहीद पोलीस जवानाच्या मुलाला क्लास-वन अधिकाऱ्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत टप्प्याटप्प्याने तब्बल दोन कोटी रुपये लुबाडणारा पुणे जिल्ह्यातील आरोपी प्रत्यक्षात मात्र कंगालच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण त्याला आॅनलाईन गेमिंगची सवय होती आणि ते सर्व पैसे त्याने त्यावर उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आरोपीकडून ते पैसे वसूल करणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे.

विशेष म्हणजे त्याने यापूर्वी अशाच पद्धतीने एकाकडून पैसे लुबाडले असल्याचीही माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचे सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी सांगितले. येत्या 28 एप्रिलपर्यंत आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे (30 वर्षे, रा.वरोडी खुर्द, ता.भोर, जि.पुणे) हा गडचिरोली पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून अजून काय माहिती समोर येते याकडे तपास यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

चकमकीत शहीद पोलीस अंमलदार गणपत नेहरु मडावी यांचा मुलगा सागर याने अनुकंपा तत्वावर वर्ग-1 पदावर नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर सन 2022 साली तो पुणे येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची ओळख आरोपी ज्ञानेश्वर वरे याच्यासोबत झाली होती.

मंत्रालयात कनेक्शन नाही, तो तर टॅक्सी चालक

आरोपी ज्ञानेश्वरने आपली मंत्रालयात ओळख असल्याची बतावणी करत सागर मडावी याला अनुकंपा तत्वावरील उप-जिल्हाधिकारी (वर्ग-1) किंवा पोलीस उपअधीक्षक पदाच्या नियुक्तीबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले. मुंबईत आपले मोठे घर, उद्योग आणि मंत्रालयात कनेक्शन असल्याची बतावणी करत त्याने सागरला भुलथापा दिल्या. त्यासाठी त्याने दुसऱ्यांच्या घराचे फोटोही सागरला टाकले. प्रत्यक्षात त्याच्याकडे असे काहीही नसून त्याच्याकडे स्वत:ची फक्त एक कार आहे. तो मुंबई-पुणे या मार्गावर टॅक्सी चालविण्याचा व्यवसाय करतो. मात्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाने ज्ञानेश्वर वरे याने इतर चार लोकांच्या मदतीने सागरची फसवणूक करुन वेळोवेळी रोख स्वरुपात, फोन-पे वरून, तसेच सागर याच्या बँक खात्याच्या एटीएममधून एकूण 2 कोटी 16 लाख 79 हजार 100 रुपये घेतले. नोकरीच्या आशेने सागरने वडीलांनी कमावून ठेवलेले सर्व गमावले. शहीद कुटुंबाला मिळणारा शासनाच्या निधीसोबतच काही स्थावर मालमत्ताही त्याने गमावली. पण प्रत्यक्षात नोकरी मात्र मिळालीच नाही.

आधी दुसऱ्यांच्या खात्यात पैसे, नंतर स्वत:च्या

ज्ञानेश्वरने सागर याला विश्वास दाखविण्यासाठी मंत्रालयातील तथाकथित ‘महाजन साहेब’ बोलत असल्याची बतावणी करून स्वत:च सागरसोबत फोनवर बोलत होता. त्यामुळे आपले काम नक्की होईल असा विश्वास सागरला वाटत होता. विशेष म्हणजे अनेक वेळा त्याने या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेल्या इतर चार लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि नंतर ते पैसे स्वत:च्या खात्यावर वळते केले. त्या चार लोकांना अद्याप अटक व्हायची असली तरी त्यांचा या प्रकरणात किती संबंध होता हे त्यांच्या बयानानंतरच स्पष्ट होणार आहे.

याआधीही केली फसवणूक

आरोपी ज्ञानेश्वर वरे याने यापूर्वी एका बेरोजगार युवकाला पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून पैसे घेतले होते. पोलीस तक्रार झाल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला होता. पण ज्ञानेश्वरने ते पैसे परत केल्यामुळे तो गुन्हा रद्द झाला होता.