
गडचिरोली : पूर्वी मोजक्या लोकाचा खेळ असलेला क्रिकट आज सर्वत्र लोकप्रिय होऊन गल्लीबोळीत खेळला जातो. त्याचप्रमाणे गोल्फ हा खेळ आज मर्यादित लोकांसाठी असला तरी त्याला अधिक लोकप्रिय करण्यासाठी “गोल्फ फॉर ऑल टूर”, अर्थात गगन (Golf at Grassroots Across the Nation) या राष्ट्रीय दृष्टिकोनाने नागपुरात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. 27 ते 29 एप्रिलदरम्यान लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात 28 दिव्यांगांनी सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले.
गोल्फ कोर्सला केवळ खेळाचे मैदान न ठेवता अभिव्यक्ती, संवाद आणि सन्मानाचे व्यासपीठ बनवण्याच्या दृष्टिने हे शिबिर महत्वपूर्ण ठरले. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात 10 ते 33 वयोगटातील 28 दिव्यांग सहभागी झाले होते. या गटात दृष्टीदोष, श्रवणदोष, ऑटिझम, बौद्धिक अडचणी आणि हालचालींमध्ये अडथळे असलेले प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
प्रत्येक प्रशिक्षणार्थीला एक “बडी” देण्यात आला, ज्यामध्ये भारतीय वायुदलातील अधिकारी, विंग कमांडरही होते. तीन दिवसांत जे घडले ते केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित नव्हते. सहभागींना गोल्फच्या मूलभूत तंत्रांची, विशेषतः चिपिंग आणि पुटिंगची ओळख करून देण्यात आली. त्यांचे बडी प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत होते. हे मार्गदर्शन हळूहळू परस्पर शिकण्यात बदलले. नवीन खेळ शिकत असताना संयम, संवाद, प्रोत्साहन आणि सहानुभूतीचे धडेही घेतले.
नागपूरच्या कडक उन्हाला न जुमानता दिव्यांग प्रशिक्षणार्थींचा उत्साह कायम होता. शिबिरात दिलेले कॅप आणि टी-शर्ट अभिमान आणि आपलेपणाचे प्रतीक ठरले. सरावाच्या मधल्या वेळेत थंड पेये आणि हसण्याच्या क्षणांनी सर्वांना नवचैतन्य दिले.
पारितोषिक वितरण
अंतिम दिवशी पारितोषिक वितरण सोहळा सामूहिक यशाचा उत्सव ठरला. प्रत्येक सहभागीला पदके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. येथे विजेते-पराजित असा भेद नव्हता. प्रत्येकाचे कौतुक झाले, प्रत्येक नाव साजरे झाले आणि प्रत्येक हसू महत्त्वाचे ठरले. खऱ्या अर्थाने, प्रत्येकजण विजेता ठरला होता.
माजी राष्ट्रीय गोल्फ प्रशिक्षक जसजित सिंग आणि दिव्यांग अध्ययनातील पीएचडीधारक डॉ.अर्चना सिंग यांच्या नेतृत्वाखाली “गोल्फ फॉर ऑल फाउंडेशन” तीन मुख्य उद्दिष्टांसाठी कार्यरत आहे. गोल्फ सर्व सामाजिक-आर्थिक आणि क्षमता स्तरांपर्यंत पोहोचवणे, दिव्यांग आणि सामान्य व्यक्तींना एकत्र आणून समावेशकता वाढवणे, सहभागींना नवीन कौशल्य देऊन पारंपरिकदृष्ट्या मर्यादित मानल्या जाणाऱ्या खेळात सहभागी होण्याची संधी देणे.
या उपक्रमाबद्दल बोलताना लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे संचालक राजेश गुप्ता म्हणाले, “या प्रशिक्षण शिबिरात आम्ही अशा जगांना एकत्र येताना पाहिले, जे सहसा वेगळे ठेवले जातात. गोल्फ आणि दिव्यांगता यांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण या तीन दिवसांत त्या सीमा नाहीशा झाल्या. सर्वजण समान पातळीवर उभे होते, शिकत, साथ देत आणि एकत्र वाढत, हेच त्या भारताचे प्रतीक आहे, जो आपण घडवत आहोत.”






























