Home दैनंदिन बातम्या 30 महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; ​गडचिरोलीत उपचार

30 महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; ​गडचिरोलीत उपचार

मा.खा.डॉ.नेते धावले मदतीला

गडचिरोली : लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी) जात असलेल्या 30 महिलांच्या टेम्पोला चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात अपघात झाला. सर्व जखमींना तात्काळ गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची भेट घेतली आणि तातडीने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले.

नेमकी घटना काय?

​डोनाळा येथील सुमारे 30 महिला एका टेम्पोने सावली तालुक्यातील अंतरगाव येथे कॅटरिंगच्या कामासाठी निघाल्या होत्या. मात्र डोनाळाच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो रस्त्यावरच उलटला. त्यामुळे टेम्पोमधील सर्व महिला गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.

​भाजप नेत्यांची तत्परता

​या घटनेची माहिती मिळताच भाजपचे सावली तालुका महामंत्री सचिन तंगडपल्लीवार व युवा नेते जितू सोनटक्के यांनी तत्परतेने माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांना माहिती दिली. त्यामुळे डॉ.नेते यांनी सर्व कार्यक्रम बाजूला सारून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी अतिरिक्त ​जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके यांच्याशी चर्चा करून रुग्णांची स्थिती आणि उपचारांची माहिती जाणून घेतली. जखमी महिला भरती असलेल्या सर्व वार्डात जाऊन वैयक्तिकरित्या त्यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.

​यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोहर कुकडे, सावलीचे ठाणेदार पुल्लुरवार, भाऊराव कोठारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जखमींचे नातेवाईक उपस्थित होते. या भीषण अपघातामुळे सावली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, राजकीय नेत्यानी दाखवलेली तत्परता आणि प्रशासनाने वेळेत दिलेला प्रतिसाद यामुळे जखमी महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत झाली आहे.