गडचिरोली : धानोरा उपविभागाअंतर्गत आणि धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परसवाडी (ता.आरमोरी) या गावात चक्क अंमली पदार्थ गांजाची शेती पिकवली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत 54 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त करून आरोपी मोरेश्वर हिरामण उसेंडी (58 वर्ष) याला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह धानोरा पोलिसांनी केली.
परसवाडीत गांजाची शेती पिकवली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परसवाडी येथील मोरेश्वर उसेंडी याच्या शेतात धाड मारून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी शेतात गांजाची लहान-मोठी झाडे लागवड केलेली आढळली.
पोलिसांनी ती झाडे जप्त केली. 54.5 कि.ग्रॅ. वजन असलेल्या कॅनबिस वनस्पती (गांजा)ची प्रतिकिलो 50 हजार रुपयेप्रमाणे एकुण किंमत 27 लाख 25 हजार रुपये आहे. आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये गांजाची लागवड केली होती. त्याच्याविरूद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी उसेंडी याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोउपनि.टेभुर्णे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा सुधीर दंडीकेवार, पोना धनंजय चौधरी, पोअं प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, चालक संदीप भेंडारे, तसेच पोस्टे धानोराचे सपोनि. प्रशांत जंगले व अंमलदारानी पार पाडली.






























