गडचिरोली : शिघ्रकोपी पुतण्याला चिडचिड कमी करण्याचा सल्ला देणे काकाच्या जीवावर बेतले. काका आपल्या भल्यासाठी सल्ला देत असल्याचे वाटण्याऐवजी त्याला हा सल्ला म्हणजे आपला अपमान आहे, असे वाटले. अशा क्षुल्लक कारणातून पुतण्याने झोपेत असलेल्या काकावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली.
हा सर्व थरार कोरची तालुक्यातील मुलेटीपदीकसा या गावात घडला. पुनाराम बैसाकू धुर्वे (65 वर्ष) असे मृत काकाचे नाव आहे. मारेकरी पुतण्या रामनाथ श्यामराव धुर्वे (20 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामनाथ हा रोजमजुरी करण्यासाठी बंगळुरू येथे गेला होता. चार महिन्यांपूर्वी तो गावाकडे आला. रामनाथ याला डोकं दुखण्याची समस्या असल्याने त्याने चांगला वैद्य कोणता आहे, अशी विचारणा काकाकडे केली होती. काकांनी त्याला औषधी तर घे, पण चिडचिड कमी करून शांत राहण्याचा सल्ला रामनाथला दिला. पण त्यांचा हा सल्ला रामनाथला अपमानकारक वाटला. तेव्हापासून तो काकांबद्दल मनात राग धरून होता.
5 मे च्या रात्री काका पुनाराम नेहमीप्रमाणे शेतातील झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. रामनाथ संधी शोधत कुऱ्हाड घेऊन तिथे पोहोचला. काका गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने कुऱ्हाडीचे घाव काकाच्या मानेवर केले. त्यामुळे पुनाराम यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रामनाथने कुऱ्हाड तिथेच फेकून देऊन पळ काढला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कोरची पोलिसांच्या पथकाने संशयाच्या आधारावर आरोपी रामनाथ याला त्याच्या घरातून अटक कली. त्याला आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.






























