Home दैनंदिन बातम्या नव्याने उभारलेल्या कुरखेडाच्या सती नदीवरील पुलावर भेगा !

नव्याने उभारलेल्या कुरखेडाच्या सती नदीवरील पुलावर भेगा !

कारवाईची 'आप'ची मागणी

पुलावर अशा भेगा पडल्या असून काही भागात सळाखी बाहेर निघण्याची शक्यता आहे

कुरखेडा : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी चे बांधकाम मागील दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच सती नदीवर नव्याने उभारलेल्या पुलाला भेगा पडल्याने या पुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

प्रशासनाचे कंत्राटदारावर विशेष प्रेम?

महामार्गाचे काम ‘कासवगतीने’ सुरू असल्याने प्रवाशांना धुळीचा आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट साहित्य आणि तांत्रिक चुकांमुळे कामाचा दर्जा खालावला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाकपणा करत आहे. प्रशासन या कंत्राटदाराचे ‘लाड’ का करत आहे? असा सवाल आपचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांनी उपस्थित केला आहे.

काम पूर्ण होण्याआधीच पडल्या भेगा

पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला पडलेल्या भेगांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेच्या नशिबी निकृष्ट बांधकाम येत असेल, तर ही बाब गंभीर आहे. पुलाच्या बांधकामात वापरलेले सिमेंट, लोखंड आणि रेती या सर्व साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.

निवेदनातून केल्या मागण्या

या संदर्भात आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात महामार्ग आणि पुलाच्या कामाची सखोल तांत्रिक चौकशी व्हावी, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार इंजिनिअर्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकावे या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी, सचिव अमृत मेहेर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.