Home दैनंदिन बातम्या वैद्यकीय महाविद्यालयात पोटाच्या कर्करोगावर जटिल शस्त्रक्रिया

वैद्यकीय महाविद्यालयात पोटाच्या कर्करोगावर जटिल शस्त्रक्रिया

यशस्वीपणे काढली जठराची गाठ

यशस्वी शस्रक्रिया करणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक

गडचिरोली : अत्यंत जटिल व आव्हानात्मक समजली जाणारी पोटातील कर्करोगावरील मोठी शस्त्रक्रिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वीपणे करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरूवात होऊन अवघे दीड वर्ष झाले असले तरी येथील रुग्णसेवा दिवसेंदिवस अधिक सक्षम होत असल्याचे या यशस्वी शस्त्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे.

सदर रुग्णास (वय 65 वर्षे, पुरुष) यांना गेल्या 3 महिन्यांपासून काळी शौच, तीव्र पोटदुखी व वजन घटणे अशी लक्षणे होती. गडचिरोली, ब्रम्हपुरी तसेच चंद्रपूर येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करूनही त्यांना आराम मिळाला नाही. अखेरीस त्यांनी गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सिटी ॲब्डो-पेल्विस, अप्पर गॅस्ट्रो-इंटेस्टाईनल स्कोपी व इतर आवश्यक तपासण्या करून रुग्णाला जठराचा (Stomach) कर्करोग असून मोठी गाठ (tumor) असल्याचे निदान केले. त्यानंतर ही जटिल शस्रक्रिया करण्यात आली.

या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेचे यशस्वी नेतृत्व शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ.अतिश बन्सोड (सहाय्यक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र विभाग) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने ही अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

डॉ.आतिश बन्सोड, यांनी सांगितले की, जठराचा कर्करोग हा अत्यंत गुंतागुंतीचा असून त्याच्या उपचारासाठी ही शस्त्रक्रिया सर्वात मोठ्या व जटिल शस्त्रक्रियांपैकी एक आहे. या आजारात रुग्णाला रक्ताची उलटी होणे, काळी शौच होणे, पोटदुखी व वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात. आतापर्यंत अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबई किंवा नागपूर येथे जावे लागत होते; मात्र आता गडचिरोलीतच ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यांनी या शस्रक्रियेसाठी सर्जरी विभागाचे कौतुक केले. गडचिरोली येथे सन 2024 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर येथे एमबीबीएस प्रथम व व्दितीय वर्षांचे विद्यार्थी प्रवेशित आहेत. प्राध्यापक वर्ग अध्यापनासोबतच रुग्णसेवेस हातभार लावत आहेत. सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असल्याने नागरिकांनी बाहेर न जाता याच रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॅा.टेकाडे यांनी केले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून तो लवकर बरा होत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी गडचिरोलीत अशी उच्च दर्जाची शस्त्रक्रिया करून दिल्याबद्दल डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ.अतिश बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रसाद बन्सोड, डॉ.देवनाथ खंडारे, डॉ.क्रुणाल चेंडकापुरे, वरिष्ठ निवासी डॉ.निलकमल मेश्राम, डॉ.अक्षय वाघमारे, डॉ.प्रशांत मगदूम, डॉ.शुभम महल्ले, डॉ.गणेश टी ए,
डॉ.पियुष किरंगे, भूलतज्ज्ञ डॉ.तृप्ती येरगुडे, सहयोगी प्राध्यापक डॉ.शीतल पेंडोर, डॉ.दीक्षा चालखुरे, वरिष्ठ निवासी डॉ.प्राजक्ता टिपले आणि नर्सिंग स्टाफने सहकार्य केले.