Home दैनंदिन बातम्या हेडरीत लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीगचे उत्साहात उद्घाटन

हेडरीत लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीगचे उत्साहात उद्घाटन

16 गावांच्या संघांचा सहभाग

एटापल्ली : बहुप्रतिक्षित लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) चे हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गावांमध्ये क्रीडा संस्कृती मजबूत करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची संकल्पना राबविण्यात आली. ग्रामीण युवकांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रभावी मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना बी.प्रभाकरन म्हणाले, “लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून ग्रामीण प्रतिभा आणि सामुदायिक एकतेचा उत्सव आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही युवकांसाठी नवीन संधी निर्माण करणे, तळागाळातील क्रीडा कौशल्य अधिक बळकट करणे आणि गावांना एक संघ, एक भावना या ध्येयाने एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”

उद्घाटन सोहळ्यात परिसरातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सामुदायिक उत्सव ठरला. या कार्यक्रमाला पुरसलगोंदीचे उपसरपंच राकेश कौडा, उदेराचे सरपंच गणेश गोटा, विविध पोलीस अधिकारी, गाव पाटील आणि पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला.

या स्पर्धेत एकूण 16 गावांचे संघ सहभागी झाले आहेत. परिसरातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणि स्पर्धात्मक भावना यातून दिसून येत आहे. संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले असून, लीग सामने 6 मे 2026 पासून सुरू झाले आहेत.

“आपलं गाव, आपला खेळ” आणि “एक संघ, एक गाव, एक जिद्द” या प्रेरणादायी घोषणांसह स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक कार्यक्रमांनी उद्घाटन सोहळ्याला रंगत आणली. उद्घाटनाच्या दिवशी लॉयड्स क्रिकेट टीम आणि ऑल ग्रामीण इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात आला. 6 षटकांच्या रोमांचक सामन्यात लॉयड्स संघाने दमदार विजय मिळविला.