गडचिरोली : केंद्र सरकारने 2026-27 च्या खरीप हंगामासाठी धान आणि कापसासह इतरही पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. सामान्य धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (MSP) प्रतिक्विंटल 72 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे सामान्य दर्जाच्या धानाचे दर आता प्रतिक्विंटल 2441 रुपयांवर पोहोचले आहेत, तर ‘ए-ग्रेड’ धानाची आधारभूत किंमत 2461 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होण्याच्या आधीच सरकारने आधारभूत किमती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना पुढील नियोजन करणे सोपे जाणार आहे. हे नवीन दर 2026-27 या हंगामासाठी लागू राहणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक परतावा देणारे दर मिळावेत; जेणेकरून शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरेल, हा या दरवाढीमागे हेतू असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
कापूस उत्पादकांना जास्त फायदा
नवीन दरानुसार सूर्यफूल बियांच्या आधारभूत दरात सर्वात जास्त वाढ करण्यात आली आहे. सूर्यफूल बियांची आधारभूत किंमत 622 रुपयांनी वाढवल्याने या बियांचे दर 8343 रुपये प्रतिक्विंटल असे झाले आहे. त्याचप्रमाणे कापसाच्या दरात 557 रुपयांपर्यंतची लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, तूर, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि नाचणी यांसारख्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्यही वाढ करण्यात आली आहे. भात आणि गहू लागवडीपलीकडे जाऊन इतर पिकांच्या लागवडीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे यामागील सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.






























