कुरखेडा : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल कुरखेडा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबतचे निवेदन त्यांना सुपूर्द केले. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह आरमोरी मतदारसंघात रखडलेली फेडरेशनची धान्य खरेदी तात्काळ सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी त्यांनी मुख्य सचिवांकडे केली.
कुरखेडा येथील ‘विशेष सर्वेक्षण व सेवा संतुष्टी मोहीमे’अंतर्गत गुरनोली येथे आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी मुख्य सचिव आले असताना ही भेट झाली.
या निवेदनात गजबे यांनी नमूद केले की, आरमोरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धान कापणी होऊन आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. काही दिवसांतच पावसाळी धान लागवडीची (खरिपाची) कामे सुरू होणार आहेत. परंतु अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मका खरेदीला मुदतवाढ व गोदामांची व्यवस्था
मका उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, तसेच साठवणुकीसाठी गोदामांची (गोडाऊन) योग्य व्यवस्था करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून त्यांचे प्रलंबित कमिशन देण्यात यावे. आरमोरी येथे फेडरेशनअंतर्गत धान्य खरेदी व साठवणुकीसाठी तात्काळ गोदामाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनातून मुख्य सचिवांकडे करण्यात आल्या.
शेतकऱ्यांची खरीपपूर्व कामे तोंडावर असल्याने आणि त्यांचा आर्थिक कोंडमारा थांबवण्यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी माजी आमदार गजबे यांनी केली. या भेटीदरम्यान मुख्य सचिवांनी सकारात्मक चर्चा करत या विषयावर योग्य ती प्रशासकीय पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
































