मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्राच्या वनअधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याने फर्निचर व्यावसायिकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेतल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह प्रत्यक्ष लाच स्वीकारलेल्या खासगी इसमावर कायदेशिर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एसीबीच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, वनविभागाच्या लाकडाचा विनापरवानगी वापर केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी एका फर्निचर व्यावसायिकाकडून आरएफओ श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी डसम प्रदीप मंडल यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित फर्निचर व्यावसायिकाने केली होती. त्यानुसार गडचिरोलीतील एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यात 3 लाखांच्या लाचेतील पहिला हप्ता 50 हजार रुपये स्वीकारताना खासगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणात आरएफओ कटकू किंवा वनरक्षक मडावी यांचा कितपत सहभाग आहे याचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे दुपारी ही कारवाई झाली असली तरी एसीबीचे पथक रात्रीपर्यंत मुलचेरा येथे या प्रकरणात कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त होते.
































