Home दैनंदिन बातम्या अहेरीच्या महिला-बाल रुग्णालयाची सेवा नियमित सुरू- आरोग्य विभाग

अहेरीच्या महिला-बाल रुग्णालयाची सेवा नियमित सुरू- आरोग्य विभाग

रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू

गडचिरोली : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवा नियमितपणे सुरू असून माता व बालकांना आवश्यक उपचार अखंडितपणे उपलब्ध करून दिले जात आहेत. रुग्णालयातील काही कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणास्तव व नीट-पीजी परीक्षेच्या तयारीसाठी राजीनामे दिले असले, तरी रिक्त पदे भरण्यासाठी व पर्यायी वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही सुरू असल्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांनी स्पष्ट केले आहे.

महिला व बाल रुग्णालय अहेरी हे दुर्गम व आदिवासीबहुल भागातील माता व बालकांना विशेष आरोग्यसेवा पुरविणारे महत्त्वाचे रुग्णालय असून तिथे प्रसुती, स्त्रीरोग, बालरोग तसेच आपत्कालीन सेवा नियमित सुरू आहेत. रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण 16 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 7 पदे भरलेली आणि 9 पदे रिक्त आहेत. सध्या रुग्णालयात एक नियमित बालरोगतज्ज्ञ कार्यरत असून सहा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत.

सदर सहा कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमानुसार पूर्वसूचना देऊन राजीनामे सादर केले असून ते 30 जून ते 10 जुलै 2026 दरम्यान कार्यमुक्त होणार आहेत. या परिस्थितीची गंभीर दखल घेत रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आवश्यकतेनुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तीन महिन्यात चार हजारांवर रुग्णांवर उपचार

रुग्णालयातील सेवा नियमित सुरू असल्याचे मागील तीन महिन्यांतील रुग्णसंख्येवरून स्पष्ट होते. एप्रिल 2026 मध्ये 892 बाह्यरुग्ण व 112 आंतररुग्ण, मे महिन्यात 1,034 बाह्यरुग्ण व 300 आंतररुग्ण, तर जून मध्ये 1,334 बाह्यरुग्ण आणि 350 आंतररुग्णांनी उपचार घेतले आहेत. मागील तीन महिन्यांत एकूण 3,260 बाह्यरुग्ण व 762 आंतररुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

इमारतीच्या देखभाल व इतर पायाभूत सुविधांबाबत संबंधित यंत्रणेमार्फत पाहणी करण्यात आली असून आवश्यक दुरुस्तीसाठी कार्यवाही सुरू आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महिला व बाल रुग्णालय, अहेरी येथे माता व नवजात बालकांसाठी आवश्यक आरोग्यसेवा नियमित सुरू असून कोणत्याही रुग्णास उपचारापासून वंचित ठेवले जात नाही. गरजेनुसार उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. दर्जेदार, सुरक्षित व अखंडित आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन कटिबद्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.