Home दैनंदिन बातम्या जिल्ह्यातील 1968 शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा उत्साहात प्रवेशोत्सव

जिल्ह्यातील 1968 शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा उत्साहात प्रवेशोत्सव

पहिल्याच दिवशी देणार पुस्तकं, गणवेश

गडचिरोली : आज, दि.30 जूनपासून नवीन शालेय सत्राचा शुभारंभ होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातील सर्व 1968 शाळांमध्ये सत्राचा पहिला दिवस उत्सव रूपाने साजरा केला जाणार आहे. यात विविध प्रकारे आणि वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. मुरखळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा हे विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली आहे. आदिवासी प्रकल्पांच्या आश्रमशाळांमध्येही विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.

प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभातफेरीद्वारे जनजागृती करून होणार आहे. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करण्यासाठी पहिल्याच दिवशी त्यांना पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, पेन, पेन्सिल, शालेय गणवेश, शूज-मोजे आणि स्कूल बॅग यांचे वितरण करण्यात येणार आहे.

आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या विविध संधींची माहिती मिळावी यासाठी प्रवेशोत्सवानिमित्त विमान प्रवासासह अभ्यास सहल, जेईई व नीट प्रवेशपूर्व परीक्षा प्रशिक्षण, तसेच न्युक्लियस बजेट योजनेअंतर्गत विद्यार्थी आणि पालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थी आणि पालकांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रवेशोत्सवाच्या नियोजनासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रकल्पांतर्गत वसतिगृहांचे गृहपाल यांची ‘पालक अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी 29 जूनपासून संबंधित आश्रमशाळांमध्ये मुक्कामी राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक समन्वय साधत आहेत.

विद्यार्थी व पालकांचा सत्कार

यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील बोर्ड परीक्षेत प्रत्येक आश्रमशाळेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सत्र 2026-27 च्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रकाशन करून नवीन शैक्षणिक वर्षाचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण करणे, शाळांमध्ये नियमित उपस्थिती वाढविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.