
गडचिरोली : प्रस्तावित विमानतळ प्रकल्पात आपल्या शेतजमिनी जाण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या हिरापूर, गुरवळा या गावांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाच्या सोहळ्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, असा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या या निर्णयापुढे शिक्षकवृंद हतबल झाल्याचे पहायला मिळाले. शाळा भेटीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. (अधिक बातमी खाली वाचा)

दरम्यान शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने महेंद्र ब्राह्मणवाडे व प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन शाळा बहिष्कार आंदोलनाची माहिती दिली. शासनाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची काळजी असेल तर तातडीने यासंदर्भातील निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली. याशिवाय सर्वपक्षीय लोकांन या लढ्यात सहभागी होऊन नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थी-पालकांची निदर्शने
हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने जमलेल्या गावातील महिला-पुरूषांनी निदर्शने केली. महिनाभरापूर्वी गडचिरोलीत झालेल्या ठिय्या आंदोलनात सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी विमानतळाच्या बाबतीत शासनस्तरावरून कोणताही निर्णय होणार नाही, तोपर्यंत जमिनी अधिग्रहणाच्या दृष्टिने कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे आश्वासन मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांना दिले होते. असे असताना शेतजमिनीव्यतिरिक्त या प्रकल्पात जाणाऱ्या वनजमिनीच्या अधिग्रहणासंदर्भातील प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने जाहीर सूचना प्रकाशित केली. हा एक प्रकारे गावकऱ्यांचा विश्वासघात असल्याची भावना हिरापूरच्या नागरिकांनी व्यक्त केली. आज वनजमिन अधिग्रहणासाठी प्रक्रिया सुरू केली, उद्या शेतजमिनीसाठीही प्रक्रिया करतील, अशी शंका व्यक्त करत जोपर्यंत यासंदर्भातील जीआर रद्द करत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेतच पाठवणार नाही, असे गावकऱ्यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी काढली समजूत
गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी हिरापूरची शाळा गाठून आंदोलन मागे घेण्याचे आणि नियमितपणे शाळा सुरू ठेवण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले. तत्पूर्वी लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष वैद्य यांनीही शाळेला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. मात्र गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
































