Home दैनंदिन बातम्या काऊंटी क्रिकेटसाठी भारतीय संघात ‘गोंडवाना’च्या रोहीत राठोडची निवड

काऊंटी क्रिकेटसाठी भारतीय संघात ‘गोंडवाना’च्या रोहीत राठोडची निवड

इंग्लंडमध्ये होणार आंतरराष्ट्रीय स्पर्धा

रोहीतचा सत्कार करून शुभेच्छा देताना मॅाडेल कॅालेजचे प्राचार्य जोशी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत मॉडेल कॉलेजमधील बी.बी.ए.(जंगले व्यवस्थापन) शाखेचा विद्यार्थी रोहीत राठोड याची इंग्लंड येथे होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गडचिरोलीचे नाव पुन्हा एकदा झळकणार आहे.

रोहीतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रोहितचे अभिनंदन करून त्याच्या आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. रोहितने आपली मेहनत, जिद्द आणि क्रीडाप्रेमाच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून, त्याचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात त्याचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असून, त्याने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी दिल्या.