गडचिरोली : महिनाभरापूर्वी एका 7 वर्षीय बालिकेवर निर्दयीपणे लैंगिक अत्याचार करणाऱ्या चामोर्शी येथील आरोपी प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (25 वर्ष) आरोपीला 12 तासांत अटक केल्यानंतर त्याला तातडीने सजा मिळण्यासाठी पोलिसांनी महत्वाचे पाऊल टाकले आहे. सर्व पुराव्यांसह या प्रकरणाचा अहवाल तयार करून तो अवघ्या 28 दिवसात न्यायालयाला सादर केला. या घटनेनंतर चामोर्शीकरांनी अभूतपूर्व संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यांना पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी स्वत: सामोरे जाऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची विनंती न्यायालयाकडे करणार असल्याचे सांगितले होते.
8 जून 2026 रोजी चामोर्शी येथे आरोपी नामे प्रज्वल उर्फ नारु भांडेकर याने एका सात वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या घरावर असलेल्या स्लॅबच्या भिंतीचा फायदा घेत निर्दयीपणे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्या चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध चामोर्शी येथे कलम 64 (1), 65 (2) भान्यासं, सहकलम 4, 6 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम रमेश, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तीन समांतर तपास पथके तयार करून आरोपीला 12 तासांत अटक केली होती.
यापूर्वी आरोपीवर सन 2019 मध्ये विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सदर दोन्ही गुन्ह्रांचे गांभीर्य लक्षात घेऊन सहा.पोलीस अधीक्षक गडचिरोली अनिकेत हिरडे यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन अवघ्या एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
































