गडचिरोली : पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्यावर असलेल्या सीमा सुरक्षा दलातील जवान (बीएसएफ) सुरेश दुर्गू आंबडर (35 वर्ष) यांना 23 जुलै रोजी वीरमरण आले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृ्त्यू झाला. ते कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी होत.
बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर 12 फूट उंच स्मार्ट फेन्सिंग (कुंपण) आणि आधुनिक रडार यंत्रणा उभारली जात आहे. याशिवाय स्पीट बोट आणि पाण्यावर तरंगणाऱ्या चौक्यांच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे. त्याच भागात सुरेश आंबडर हे कर्तव्यावर असताना संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या सुरेश आंबडर यांच्या मागे पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या शहीद होण्याची बातमी पसरताच गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव शरीर त्यांच्या मूळ गावी पोहोचवले जाईल. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
































