गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील प्रस्तावित खाणींना विरोध दर्शवण्यासाठी त्या भागात नक्षलवादी सक्रिय असल्याचे भासवण्यासाठी बॅनर आणि पत्रकांतून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन इसमांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. गडचिरोली जिल्ह्यात एकही माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. अशात गेल्या 12 जुलै रोजी अज्ञात व्यक्तींकडून एटापल्ली तालुक्यात नक्षली मजकूर असलेली पत्रके व बॅनर लावले होते. त्याचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश आले.
गुप्त माहितीच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी शिवा अनिल मिस्त्री (48 वर्ष), रा.तरुणनगर, ता.पाखांजुर जि.कांकेर (छत्तीसगड) आणि रोहीत रंजित मल्लीक (25 वर्ष), रा.वटेली, ता.एटापल्ली अशी त्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी दहशत पसरवण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात आला असून गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर आता एकही माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाने “ऑपरेशन अंतिम प्रहार” च्या माध्यमातून विशेष शोधमोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद्यांची दहशत संपुष्टात आणली आहे. असे असताना दि.12 जुलै 2026 रोजी माओवादी सक्रिय असल्याचे भासवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पिपली बुर्गी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पत्रके व बॅनर लावली होती.
पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पुरावे व गोपनिय बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बॅनर, पत्रक तयार करणाऱ्या दोघांना पकडले. यात अजून काही सहकाऱ्यांचा समावेश असून त्यांचा शोध सुरु आहे.
पोलीस अधीक्षकांनी सदर कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करत नागरिकांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, तसेच या प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होवू नये, असे आवाहन केले. अशा कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
































