गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा अनेक गावांना फटका बसला आहे. पर्लकोटा नदीचे पाणी जुन्या पुलावर चढून गावाकडे आल्याने बुधवारच्या मध्यरात्रीपासून भामरागडसह अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटलेला आहे. दरम्यान पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
विशेष म्हणजे भामरागड, सिरोचासह शेकडो गावांचा वीज पुरवठा 24 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून खंडीत झाला. सिरोंचा मार्गावर आज पहाटे वीज पुरवठा सुरू झाला. मात्र भामरागड लाईनचा वीज पुरवठा 30 तासांपासून खंडीतच आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. पर्लकोटाचा पूर रात्रीपासून ओसरणे सुरू आहे. पण आज सकाळपर्यंत पुलावरून पाणी वाहात असल्यामुळे वाहतूक ठप्पच आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पूरग्रस्त भागातील उपाययोजना आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. गुरूवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार, 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 123 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 163 मिमी पाऊस गडचिरोली आणि मुलचेरा तालुक्यात झाला. याशिवाय छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे.
सुरक्षितस्थळी हलविलेल्या भामरागड तालुक्यातील सुमारे 700 नागरिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था विविध आश्रमशाळा, तसेच अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एसडीआरएफच्या मदतीने बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत बचाव व मदतकार्य प्रभावीपणे सुरू ठेवण्यास सांगितले. पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
गुरूवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील 25 मार्ग वाहतुकीसाठी बंद होते. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेमार्फत नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
गुरूवारी संध्याकाळपर्यंत खालील मार्ग बंद होते, त्यातील काही मार्ग आता सुरू होण्याची शक्यता आहे.
1) आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (मोसम नाला)
2) आष्टी-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग (दिना नदी)
3) कुरखेडा- वैरागड रस्ता (सती नदी) ता.कुरखेडा
4) एटापल्ली कसनसूर रस्ता, ता.एटापल्ली (झुरी नाला)
5) गट्टा नाका ते एटापल्ली पोचमार्ग (स्थानिक नाला)
6) धानोरा ते रांगी रस्ता, ता.धानोरा
7) रोमपल्ली ते झिंगानूर रस्ता, ता.सिरोंचा
8) एटापल्ली ते गट्टा रस्ता, ता.एटापल्ली (बांडिया नदी पूल, अलदंडी पूल, तुमरगुडा नाला व जांबिया गावाजवळ, नेंडेर गावाजवळ )
9) मुलचेरा ते आलापल्ली रस्ता, ता.मुलचेरा
10) अहेरी ते देवलमारी वट्रा रस्ता, (वट्रा नाला)
11) पोटेगाव ते देवापूर घोट रस्ता (ता.गडचिरोली)
12) कसनसूर-रेगडी रस्ता, ता.एटापल्ली (वेनापूर, झरी, कोटमी जवळ)
13) एटापल्ली- देवदा (हेटलकसा गावाजवळ )
14) आष्टी-एल्लूर-चौडमपल्ली, ता.चामोर्शी (चौडमपल्ली नाला )
15) गणपूर-विठ्ठलपूर रस्ता, ता.चामोर्शी (चांदेश्वर नाला )
16) वैरागड-देलनवाडी, ता.आरमोरी
17) ताडगाव-दामरंचा रस्ता, ता.भामरागड
18) वैरागड-रांगी रस्ता, ता.आरमोरी
19) घोट-सुभाषग्राम रस्ता, ता.चामोर्शी
20) कढोली ते उराडी, ता.कुरखेडा
21) चांडाळा-गुरवळा रस्ता, ता.गडचिरोली
22) घोट-रेगडी रस्ता (रेगडी जवळ)
23) कुरुड-वडसा रस्ता, ता.देसाईगंज
24) कासवी-उसेगाव-कोरेगाव, ता.देसाईगंज
25) चातगाव-रांगी, ता.गडचिरोली (खुर्सा गावाजवळ )
































