
गडचिरोली : छत्तीसगडमधून वाहात येणाऱ्या इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा या तीन नद्यांच्या पुराचा दबाव वाढून नद्यांचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने संपूर्ण गाव जलमय झाले आहे. जिकडेतिकडे पाणीच पाणी साचलेले असल्याने भामरागडचे जनजीवन गेल्या 50 तासांपासून ठप्प झाले होते. त्यात कहर म्हणजे बुधवारच्या रात्रीपासून खंडीत झालेला वीज पुरवठा आज (शनिवारी) सकाळपर्यंत सुरू झालेला नव्हता. दरम्यान पर्लकोटा नदीचा पूर ओसरून पूल मोकळा झाल्याने आज सकाळी भामरागडचा संपर्क सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात बुधवारपासून जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे बुधवारच्या मध्यरात्रीच नद्यांचे पाणी भामरागडमध्ये शिरणे सुरू झाले होते. प्रशासनाने 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असले तरी अनेक घरांना शुक्रवारी दिवसभर पाण्याचा वेढा कायम होता. त्यामुळे बहुतांश नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झालेले आहे. एसडीआरएफची चमू दोन मोटारबोटसह भामरागडमध्ये तळ ठोकून आहे.
गुरूवारी रात्री पाण्याचा वेढा कमी होत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे शुक्रवारी भामरागड जलमुक्त होईल असा अंदाज बांधल्या जात होता. मात्र शुक्रवारी दिवसभर ‘जैसे थे’ स्थिती असल्याने या परिस्थितीला तोंड देताना भामरागडवासियांसोबत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. पूरपरिस्थितीमुळे भामरागडवासियांसमोर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशुद्ध पाण्यामुळे विविध आजार तोंड वर काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला अधिक सतर्क आणि सुसज्ज राहावे लागणार आहे.
वीज कंपनीचे काम संथगतीने
आलापल्लीकडून भामरागडला जाणाऱ्या वीजवाहक तारांमधील तांत्रिक बिघाड 50 तासांपेक्षा अधिक काळापासून दुरूस्त करणे वीज कंपनीला शक्य झाले नसल्यामुळे भामरागडसह कित्येक गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. वीज पुरवठाच नसल्यामुळे मोबाईलचे टॅावर आणि नागरिकांचे मोबाईलसुद्धा चार्ज नाहीत. त्यामुळे आपतकालिन स्थितीत तातडीने संवाद साधने सामान्य नागरिकांना अशक्य झाले आहे. या सर्व स्थितीपुढे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
































