Home दैनंदिन बातम्या अधिकाऱ्यांना सोडवेना गडचिरोली, पदोन्नतीनंतरही दुसरीकडे रूजू नाही

अधिकाऱ्यांना सोडवेना गडचिरोली, पदोन्नतीनंतरही दुसरीकडे रूजू नाही

अरविंद कात्रटवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गडचिरोली : गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांची पदोन्नतीने नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगर परिषद प्रशासन संचालनालयात बदली झाली आहे. मात्र बदलीचा आदेश 21 जुलैला येऊनही साखरवाडे यांनी अद्याप गडचिरोली सोडले नसल्यामुळे छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करत साखरवाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

साखरवाडे हे गडचिरोलीत आधी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 आणि नंतर काही दिवस दुसरीकडे काढल्यानंतर पुन्हा गडचिरोलीत सा.बां.विभाग क्रमांक 2 मध्ये रुजू झाले. त्यांचा गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ जवळपास 8 वर्षाचा झाला आहे. आता पदोन्नतीने नागपूरला बदली झाली असतानाही त्यांना गडचिरोली सोडवत नसल्यामुळे गडचिरोलीचे एवढे आकर्षण कसे, याबद्दल कात्रटवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात अरविंद कात्रटवार यांनी साखरवाडे यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या गडचिरोलीतील कार्यकाळातील अनेक कामांमध्ये भ्रष्टाचाराचा संशय आहे. कोरची तालुक्यातील नाडेकल मार्गावरील पूल सुरू होण्यापुर्वीच पूल कोसळला. अनेक कामांच्या निविदा नियबाह्यरित्या आॅफलाईन काढून केवळ मजूर सहकारी संस्थांना 20 टक्के दराने कामे विकल्याचाही आरोप कात्रटवार यांनी केला आहे. साखरवाडे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कात्रटवार यांनी अनेक आंदोलने करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

यानंतर गेल्या 21 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने साखरवाडे यांचा बदली आदेश काढला. मात्र 3 आॅगस्टपर्यंत ते बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नव्हते. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती यचिका क्र.28306/2017 मधील निर्णयास अधीन राहून, हा बदली आदेश काढला होता. बदली झालेल्या अधिकाऱ्याने कमीत कमी अवधी घेऊन नवीन पदाचा पदभार स्विकारावा व महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली 2021 मधील तरतूदीनुसार, पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी पदोन्नती आदेशाच्या तारखेपासून विहीत मुदतीत पदस्थापनेच्या पदावर रूजू होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील, असेही शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

अधीक्षक अभियंता म्हणून गडचिरोलीतच पदस्थापना मिळावी यासाठी साखरवाडे यांच्या हालचाली सुरू असल्याची शंका व्यक्त करत अशा अभियंत्याला पुन्हा गडचिरोलीत थारा देऊ नये, अशी विनंती कात्रटवार यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे. साखरवाडे यांना पुन्हा गडचिरोलीत पदस्थापना मिळाल्यास अधीक्षक अभियंता कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 कार्यालयाला छत्रपती सेनेकडून कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.