Home पब्लिक प्रॉब्लेम जमिनी वाचविण्यासाठी गडचिरोलीचे शेतकरी पोहोचले दिल्ली दरबारी

जमिनी वाचविण्यासाठी गडचिरोलीचे शेतकरी पोहोचले दिल्ली दरबारी

उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना निवेदन

उपराष्ट्रपतींना निवेदन देताना खासदारांसह महेंद्र ब्राह्मणवाडे व शेतकरी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनविण्याच्या नावाखाली शासनाकडून विमानतळासह इतर प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.3) नवी दिल्लीत उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. देशातील सहा खासदारांच्या शिष्टमंडळासह शेतकरी संघर्ष कृती समितीचे संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उपराष्ट्रपतींपर्यंत पोहोचवल्या. शेती हेच आमच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे जमिनी गेल्यास अनेक शेतकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर–गुरुवळा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांमध्ये तसेच जयरामपूर परिसरातील 13 गावांतील एमआयडीसी प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही एमआयडीसी, विमानतळ अथवा इतर शासकीय प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी विविध निवेदने, आंदोलने, मोर्चे तसेच मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची मुंबई येथे भेट घेऊन जमीन अधिग्रहणाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

हस्तक्षेप करून न्याय द्या

शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींना सांगितले की, गडचिरोली जिल्हा हा पेसा क्षेत्रात येत असून पेसा कायद्यानुसार ग्रामसभांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. मात्र ग्रामसभांचा स्पष्ट विरोध असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हा पेसा कायद्याचा भंग आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार प्रशांत पडोळे, खासदार गोवाल पाडवी, खासदार सलंग ए सदमा, तसेच महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळात मनोहर पा.पोरेटी, अॅड.दुष्यन्त नामदेव किरसान, दिवाकर निसार (हिरापूर), प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एल्टीवार आदी शेतकरी उपस्थित होते.