Home दैनंदिन बातम्या कोटी-कोरनार पूल खचल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार?

कोटी-कोरनार पूल खचल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार?

मुख्यमंत्री सचिवालयाकडून संकेत

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना बीआरएसपीचे पदाधिकारी

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2023 रोजी उद्घाटन झालेल्या एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरनारचा पूल नाल्याच्या पुराने खचून गेल्याची घटना मागील महिन्यात घडली. या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री सचिवालयाने दिले. यासंदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन पाठविले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने चौकशी करण्याचे संकेत दिले.

याप्रकरणी बीआरएसपीने मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविलेल्या निवेदनात कोठी-कोरनार पूल दुर्घटनेसंदर्भात अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामांची व मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे व पदाधिकाऱ्यांनी केली होती.

मागणीची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासंदर्भातील पत्र 17 आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मिलिंद बांबोळे यांना प्राप्त झाले. या प्रकरणातील संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि बांधकामासंदर्भातील व्यवहारात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.