Home दैनंदिन बातम्या गडचिरोली मेडिकल कॅालेजच्या प्र.अधिष्ठातापदी डॅा.राजेंद्र सुरपाम

गडचिरोली मेडिकल कॅालेजच्या प्र.अधिष्ठातापदी डॅा.राजेंद्र सुरपाम

नियमित अधिष्ठाता कधी मिळणार?

गडचिरोली : गडचिरोलीत गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातापदी डॅा.राजेंद्र सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली. डॅा.सुरपाम हे चंद्रपूरच्या कर्मवीर मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत.

मेडिकल कॅालेजची प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे दोन वर्षांपासून प्रभारी अधिष्ठाता म्हणून चंद्रपूरच्या मेडिकल कॅालेजचे प्राध्यापक अविनाश टेकाडे यांच्याकडे प्रभार होता. तो आता डॅा.सुरपाम यांच्याकडे देण्यात आला. गडचिरोली ट्रायबल डॅाक्टर्स असोसिएशनने त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

डॅा.सुरपाम यांनी त्यांच्या मूळ आस्थापनेवरील (चंद्रपूर) कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सांभाळून गडचिरोलीत अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळावा असा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढला आहे. वास्तविक अधिष्ठाता म्हणून मोठी जबाबदारी सांभाळत असताना इतर कर्तव्यासाठी वेळ देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे डॅा.सुरपाम यांना नियमित अधिष्ठाता म्हणूनच जबाबदारी देण्यात यावी, अशी अपेक्षा गडचिरोलीतील वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.