
गडचिरोली : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने काल (दि.17) ‘विदर्भाची काशी’ मार्कंडादेव येथे उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर पहिल्यांदाच गंगापुजनासह महाआरतीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आयोजित या धार्मिक उपक्रमाला जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील राजकीय मंडळींसह मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली.
अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सोमवारी संध्याकाळी झालेल्या या अभिनव उपक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनीही सहभाग घेतला. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या पद्धतीने गंगापुजन आणि महाआरती केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी सर्वप्रथम मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विधिवत पूजा-अर्चना व आरती केली. त्यानंतर वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यात आले.
शंखनाद, डमरूचा निनाद आणि हर-हर महादेवच्या जयघोषात विधिवत गंगापूजन व महाआरती पार पडली. नदीच्या पवित्र प्रवाहासमोर दीपप्रज्वलन करत करण्यात आलेल्या या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा-आरतीत सहभाग घेतला. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने वैनगंगेचा तीर दुमदुमून गेला होता.
या ऐतिहासिक गंगापूजा आणि महाआरती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सहाय्यक सुनील मित्रा, अनिरुद्ध पालकर, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, नागपूरचे आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, वैरागडच्या ग्रा.पं.सदस्य शितल सोमनानी, संतोष तंगडपल्लीवार, दिलीप चलाख, संजय बारापात्रे, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, यश गण्यारपवार यांच्यासह मुरलीधर महाराज, नागपूरे महाराज व परिसरातील पुजारीगण, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारावर भाविक उपस्थित होते.
वैनगंगेच्या तीरावर प्रथमच झालेल्या या महाआरती व गंगापुजनामुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात एक नवा अध्याय जोडला गेला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
































