Home दैनंदिन बातम्या महा वॅाकेथॅानमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

महा वॅाकेथॅानमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

जलसंधारण दिनानिमित्त जलजागृती

महा वॅाकेथॅानच्या शुभारंभप्रसंगी आ.डॅा.मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर आणि अधिकारीगण.
जिल्हा स्टेडिअमवर आयोजित समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.

गडचिरोली : जलसंधारण दिनानिमित्त आज (21 आॅगस्ट) गडचिरोलीत महा वॅाकेथॅानचे आयोजन केले होते. सकाळी 6.30 वाजता इंदिरा गांधी चौकात आमदार डॅा.मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी झेंडा दाखवून या वॅाकेथॅानचा शुभारंभ केला. हजारो विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होऊन लोकसहभागातून जलजागृती करत जलसमृद्धीकडे वाटचाल करण्याचा संकल्प केला.

मृद व जलसंधारण विभागातर्फे दि.15 ते 21 आॅगस्ट यादरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप आज महा वॅाकेथॅानने करण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ असा संदेश देत हाती जलजागृती करणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थी या वॅाकेथॅानमध्ये सहभागी झाले. इंदिरा गांधी चौकापासून जिल्हा स्टेडिअमपर्यंत चालत जाऊन गडचिरोलीकरांचे लक्ष वेधून घेतले. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची शपथ सर्वांना देण्यात आली.

जिल्हा स्टेडिअमवर आ.डॅा.मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.वर्षा लहाडे, गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कोठेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार,  सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अर्जुनवार आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करून या मॅरेथॅानचा समारोप करण्यात आला.