Home दैनंदिन बातम्या सिरोंचा मार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

सिरोंचा मार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश

गडचिरोली : आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. महामार्गावरील उर्वरित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून 31 मार्च 2027 पर्यंत संपूर्ण रस्ता वाहतुकीस सुयोग्य करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच कामाची महिनानिहाय उद्दिष्टे निश्चित करून त्यानुसार प्रगतीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.

अहेरी तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी आलापल्ली– सिरोंचा मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करत महामार्गाची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे, अपूर्ण भाग तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या ठिकाणांची पाहणी केली. रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर यावेळी उपस्थित होते.

या दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी व संबंधित रस्त्यांच्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आलापल्ली– सिरोंचा मार्गावरील मुख्य काम फेब्रुवारी 2027 पर्यंत, तर महामार्गावरील उर्वरित कामे 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील विलंब टाळण्यासाठी केवळ अंतिम मुदतीच्या आधारे आढावा न घेता प्रत्येक महिन्यासाठी कामाचे निश्चित उद्दिष्ट ठरवावे आणि त्यानुसार प्रत्यक्ष प्रगतीचे मूल्यमापन करावे, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले. निर्धारित महिनानिहाय उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदाराला तात्काळ नोटीस बजावावी, तसेच नियमानुसार आवश्यक दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.

यासोबतच लगाम–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कंत्राटदाराच्या कामाचा मासिक प्रगती अहवाल निर्धारित नियोजनाच्या अनुषंगाने नियमितपणे सादर करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले.

महामार्गाच्या कामाचा वेग वाढवितानाच गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही, याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. निर्धारित महिनानिहाय उद्दिष्टांनुसार कामाची प्रगती सुनिश्चित करावी तसेच विलंब झाल्यास संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले.