Home दैनंदिन बातम्या ओबीसीचा स्वतंत्र कलम नसल्यास देशभर जनगणनेवर बहिष्कार

ओबीसीचा स्वतंत्र कलम नसल्यास देशभर जनगणनेवर बहिष्कार

ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना पदाधिकारी
अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना ओबीसी महासंघाचे पदाधिकारी

गडचिरोली : जनगणना 2027 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यासोबत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, तसेच ड्रॉप डाऊन मेनू तयार करून त्याद्वारे लोकसंख्या मोजण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ही मागणी मान्य न झाल्यास समविचारी ओबीसी संघटनांच्या माध्यमातून देशव्यापी जनगणना बहिष्कार आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आली. निवेदनात नमूद केल्यानुसार, भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक हक्कांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु देशातील सर्वात मोठ्या सामाजिक घटकांपैकी एक असलेल्या इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची अचूक जातनिहाय लोकसंख्या आजपर्यंत अधिकृत जनगणनेतून उपलब्ध झालेली नाही. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.

1931 मध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय लोकसंख्या मोजण्यासाठी व्यापक जनगणना झाली होती. परंतु त्यानंतर मात्र इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जातनिहाय लोकसंख्या अधिकृतपणे निश्चित करण्यात आली नाही. 2010 पासून देशभरातून जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली. संसदेतील चर्चेनंतर तत्कालीन केंद्र सरकारने 2011 मध्ये सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण (SECC) करण्याचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणात जातींची माहिती संकलित करण्यात आली; परंतु जातविषयक माहितीमध्ये लाखो तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण नमूद करीत केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी आजतागायत अधिकृतपणे जाहीर केली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा अधिकृत प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

देशातील विविध ओबीसी संघटनांचा तसेच विरोधी पक्षांचा जातनिहाय जनगणना करण्याच्या संदर्भात वाढता दबाव पाहता केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी आगामी जनगणनेमध्ये ओबीसींची जातनिहाय गणना करण्याचा निर्णय जाहीर केला, मात्र 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 10 मध्ये ‘Scheduled Caste (SC)/Scheduled Tribe (ST)/Caste’ असा उल्लेख आहे. त्यामध्ये ओबीसी असा स्वतंत्र कॉलम किंवा स्वतंत्र वर्गवारी स्पष्टपणे नमूद केलेली नाही.

केवळ खुल्या स्वरूपात व्यक्तीची जात नोंदविणे आणि त्या व्यक्तीची ओबीसी म्हणून स्वतंत्र वर्गवारी निश्चित करणे या दोन भिन्न बाबी आहेत. जातनिहाय माहितीचे योग्य संकलन, प्रमाणीकरण, वर्गीकरण आणि विश्लेषण झाले नाही तर भविष्यात पुन्हा 2011 प्रमाणे आकडेवारीच्या अचूकतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात.

यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 23 मार्च 2026 रोजी दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते. 28 जून रोजी चंद्रपूर येथे महामोर्चा, 7 ऑगस्टला बेंगलोर येथे राष्ट्रीय महाधिवेशन, सप्टेंबर व आक्टोबरमध्ये नागपूर, हैदराबाद, दिल्ली येथे राष्ट्रीय बैठकांच्या माध्यमातून भारतीय जनगणना 2027 मध्ये एससी, एसटी प्रमाणे ओबीसीचा स्वतंत्र कॅालम समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र शासन व जनगणना आयुक्तांना निवेदने दिली होती, मात्र अजूनपर्यंत जनगणनेच्या अधिसूचनेत दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

आता महासंघाच्या वतीने शेवटचा प्रयत्न म्हणून संसदेच्या अधिवेशनाच्या काळात 14 व 15 डिसेंबर रोजी रामलीला मैदानावर दोन दिवशीय महाधरणे आंदोलन आयोजित केले आहे. त्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारचे लक्ष जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम समाविष्ट करण्याच्या मागणीकडे वेधण्याचा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. या उपरांतही जर केंद्र शासनाने जानेवारी 2027 मध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कलम समाविष्ट न केल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तसेच इतर समविचारी ओबीसी संघटनांच्या माध्यमातून देशभर जनगणना बहिष्कार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे.

निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष रामकृष्ण ताजने, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, प्रा.देवानंद कामडी, सचिव सुरेश भांडेकर, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, मार्गदर्शक गोविंदराव बानबले, संघटक चंद्रकांत शिवणकर, ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे ज़िल्हाध्यक्ष विलास मस्के, महिला महासंघाच्या सचिव नम्रता कुत्तरमारे, कार्याध्यक्ष अलका गुरनुले, उपाध्यक्ष ज्योती दिलीप भोयर, सुधा चौधरी, तालुकाध्यक्ष घनश्याम जक्कुलवार, विजय कुत्तरमारे, अरुण झाडे, डॉ.दिलीप भोयर, वामन गुरनुले, प्रफुल्ल आंबोरकर, दिलीप मेश्राम, आशिष ब्राह्मणवाडे, दादाजी चापले, अशोक दुधबळे, पांडुरंग नागापुरे, राकेश चौधरी इत्यादी उपस्थित होते.