Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय विचारमंथन बैठक

गडचिरोलीत आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय विचारमंथन बैठक

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची एकजुट

गडचिरोली : आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांची जिल्हास्तरीय विचारमंथन बैठक येथील हॉटेल जिंजर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही या उपक्रमाची दुसरी त्रैमासिक विचारमंथन बैठक होती. आदिवासी समाजाच्या विविध समस्या, अडचणी, विकासाच्या संधी तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे समाजाच्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुट होऊन काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते हे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच आमदार डॉ.मिलिंद नरोटे, सामाजिक नेते देवाजी तोफा, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ.नितीन कोडवते, नंदू नरोटे, सदानंद ताडाम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, डॉ.छाया उईके, डॉ.सचिन मडावी, डॉ.मनोहर मडावी, देवराव अलाम, अमरसिंह गेडाम यांच्यासह आदिवासी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विचारमंथन बैठकीस गडचिरोली जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे विचार करण्यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अशोक नेते म्हणाले, यापूर्वी आदिवासी समाजाची पहिली विचारमंथन बैठक राज्यसभेच्या खासदार मायाताई ईवनाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. अशा बैठकीच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या व अडचणी मांडण्यासोबतच त्यावर सामूहिक विचारमंथन करण्याची संधी मिळते. समाजाच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यातून योग्य मार्ग शोधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. आदिवासी समाजाच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी अशा प्रकारचे विचारमंथन सातत्याने होणे गरजेचे आहे.

‘केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. आदिवासी समाजाच्या काही समस्या किंवा अडचणी प्रलंबित राहिल्यास त्या सोडविण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. समाजाच्या प्रश्नांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची माझी भूमिका राहील,’ असे डॉ.नेते म्हणाले.

आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्हास्तरीय विचारमंथन बैठकीची संकल्पना आदिवासी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यासाठी पुढे आली आहे. अशा प्रकारची बैठक आयोजित करता येत असल्याचा आनंद असून, या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे विचार आणि प्रश्न जाणून घेता येतात. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आदिवासी समाजाच्या हितासाठी सर्वपक्षीय बांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे. समाजाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न आणि एकजूट हीच या विचारमंथन बैठकीमागील प्रमुख भूमिका आहे.

या बैठकीत आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली. समाजाच्या विकासासाठी भविष्यातील दिशा, संघटनात्मक समन्वय, विविध समस्या शासनस्तरावर मांडणे आणि त्यावर सामूहिकपणे पाठपुरावा करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.