Home दैनंदिन बातम्या हक्क आणि अधिकारांसाठी नर्सेसनी संघटित राहणे गरजेचे

हक्क आणि अधिकारांसाठी नर्सेसनी संघटित राहणे गरजेचे

माया शिरसाट यांचे आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यातील नर्सेस भगिनी आदिवासी परिसरातील खेड्यापाड्यात राहून अहोरात्र आरोग्य सेवा देतात. घरोघरी जावून रुग्णांची काळजी घेतात. आरोग्य विभाग अनेक कामे परिचारिकांवर लादते, तरीही शासन पगारवाढ, नियमित भत्ते, मानधन याकडे हेतुपुरस्सर लक्ष देत नाही. नर्सेसनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तरच समस्या सुटू शकतील, असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष माया शिरसाट यांनी केले.

गडचिरोली पंचायत समितीच्या सभागृह पार पडलेल्या नर्सेस संघटनेच्या आमसभेत त्या बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नर्सेस संघटनेच्या कार्याध्यक्ष कविता बोदरे तर उद्घाटक म्हणून माजी विस्तार अधिकारी रतन शेंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्यकारिणी सरचिटणीस रंजना कोहपरे, नर्सेस संघटनेच्या मार्गदर्शक माया शिरसाट, ग्रामविकास अधिकारी कविश्वर बनपुरकर, ग्रामसेवक संघटनेचे सचिव खुशाल नेवारे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.मुनिश्वर बोरकर, चक्रधर मेश्राम, अमृता नागदेवते, सुलोचना शिरभाते आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रतन शेंन्डे म्हणाले, खेड्यापाड्यात नोकरी करणारी परिचारिका ही वाघीन आहे आणि त्यांची वाघांची संघटना आहे. अन्यायाला प्रतिकार करणारी नर्स आणि नर्सेस संघटना आहे. अन्यायाच्या विरोधात पेटून उठून प्रसंगी अधिकाऱ्यांना हालवून सोडतो एवढी ताकद नर्सेस संघटनेमध्ये आहे. याप्रसंगी कविता बोदरे, कविश्वर बनपुरकर, प्रा.मुनिश्वर बोरकर, चक्रधर मेश्राम यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सेवानिवृत्त परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. संचलन संघटनेच्या सचिव शर्मिला जनबंधु तर आभार प्रदर्शन मंगला चंदनखेडे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.