गडचिरोली : जिल्ह्याच्या आलापल्ली वनविभागांतर्गत येणाऱ्या सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमाता मंदिर परिसरातून वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना रंगेहाथ पकडल्यानंतर आलापल्ली वनविभागात वन्यजीवांची तस्करी थांबलेली नसल्याचे स्पष्ट झाले. या तस्करांचे जाळे किती लांब पसरले आहे याची सखोल चौकशी करण्याचे आव्हान वनविभागापुढे आले आहे. वनकोठडीदरम्यान आरोपींकडून याबाबतची माहिती बाहेर काढून तस्करीतील इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे आरोपींकडे आढळलेले वाघाचे दोन दात आणि हाडं कोणत्या वाघाच्या शिकारीतून मिळवली, ही शिकार कधी आणि कोणी केली याचाही तपास महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय एका पिलासह जिवंत खवले मांजरही जप्त करण्यात आले.
आलापल्ली वनविभागाअंतर्गत आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमाता मंदिर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर.रामगुंडेवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात 6 आरोपींना पकडल्यानंतर त्यांना 1 आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी मंजूर करण्यात आली. या वन्यजीव तस्करांचे जाळे छत्तीसगड राज्यापर्यंत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मात्र वन्यजीवांच्या खरेदी-विक्रीची संपूर्ण साखळी, वन्यजीवांच्या अवयवांचे स्रोत, त्यांचे संभाव्य व्यवहार याबाबत सखोल तपास केला जात आहे.
विशेष म्हणजे आलापल्ली वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील काही वनपरिक्षेत्रात अलिकडे वन्यजीवांच्या तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत, मात्र तरीही त्याला रोखण्यात वनविभागाला पूर्णपणे यश आलेले नाही. वन्यजीवांची शिकार आणि तस्करी करणे हा जैवविविधतेसाठी गंभीर धोका आहे. त्यामुळे अशा तस्करांविरूद्ध प्रभावीपणे कारवाई केली जाणार असून नागरिकांनी यासंदर्भात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर.रामगुंडेवार यांनी केले आहे.
































