Home दैनंदिन बातम्या गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांनी दुर्बिणीतून अनुभवली शनीची वलये

गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांनी दुर्बिणीतून अनुभवली शनीची वलये

‘आकाशवेध’मधून अवकाश निरीक्षण

दुर्बिणीतून अवकाश निरीक्षण करताना विद्यार्थी

गडचिरोली : आकाशातील ग्रहताऱ्यांविषयी केवळ पुस्तकातून माहिती घेण्याऐवजी त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव गोंडवाना विद्यापीठाच्या एम.एस्सी.भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी घेतला. पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित ‘आकाशवेध’ या आकाश निरीक्षण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक दुर्बिणीतून शनी ग्रह आणि त्याची भव्य वलये प्रत्यक्ष पाहिली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र आणि अवकाश संशोधनाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनातून गोंडवाना विद्यापीठाच्या भौतिकशास्र पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या (PGTD) वतीने ‘आकाशवेध’ या आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शनी ग्रहाचे प्रत्यक्ष दुर्बिणीतून केलेले निरीक्षण होय. अत्याधुनिक दुर्बिणीतून विद्यार्थ्यांनी शनीचे बारकाईने निरीक्षण केले. या आधुनिक दुर्बिणीमध्ये GoTo आणि Automated Tracking System असल्यामुळे आकाशातील शनीचे स्थान अचूकपणे शोधून त्याचा सतत मागोवा घेता येतो.

दुर्बिणीतून शनीभोवती दिसणारी त्याची भव्य वलये (Rings) विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली. शनीची वलये प्रामुख्याने बर्फाचे कण, खडकांचे तुकडे आणि धुलिकण यांच्यापासून बनलेली आहेत. वलयांची विविध रचना, त्यातील अंतर आणि शनीभोवती त्यांची कक्षा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शनी हा सौरमालेतील सूर्यापासून सहावा ग्रह आणि आकारमानानुसार दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. तो मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियम या वायूंनी बनलेला असून त्याला पृथ्वीसारखा घन पृष्ठभाग नाही.

शनीच्या उपग्रहांविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यापैकी टायटन (Titan) हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह असून त्याला दाट वातावरण आहे. तसेच इतर उपग्रहांच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः Enceladus या बर्फाच्छादित उपग्रहाखाली पाण्याचा महासागर असण्याच्या शक्यतेमुळे तो वैज्ञानिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शनीची संपूर्ण ग्रह-उपग्रह प्रणाली ग्रहविज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

शनीसोबतच विद्यार्थ्यांनी विविध तारे, तेजोमेघ (Nebulae) आणि Deep-Sky Objects शोधण्याचा प्रयत्न केला. आधुनिक GoTo telescope च्या साहाय्याने खगोलीय वस्तूंचे अचूक स्थान शोधणे आणि त्यांचा मागोवा घेणे याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रहांची गती, गुरुत्वाकर्षण, प्रकाशाचा प्रवास, उपग्रहांच्या कक्षा, वलयांची निर्मिती आणि दुर्बिणीच्या कार्यपद्धती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा केली. त्यामुळे वर्गात शिकविल्या जाणाऱ्या सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा प्रत्यक्ष आकाश निरीक्षणाशी संबंध जोडता आला.

या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख प्रा.डॉ.अपर्णा भाके यांच्या मार्गदर्शनात डॉ.नंदकिशोर मेश्राम, डॉ.प्रितेश जाधव आणि विकास पुंसे यांनी केले होते. या नाविन्यपूर्ण आणि अनुभवाधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, खगोलशास्त्राची आवड आणि अवकाश संशोधनाची जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.