
गडचिरोली : ‘सारेगामा’फेम गायक अभिजित कोसंबी आणि त्यांच्या संचाने सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतं आणि समुह नृत्याने सोमवारी गडचिरोलीकर रसिक श्रोत्यांना तृप्त केले. गोंडवाना विद्यापीठ आणि शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी संस्कृती आणि लोककलेचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.
‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात भक्तिगीतं, लोकगीतं, पोवाडा, लावणी अशा विविध प्रकारच्या गीतं आणि नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा आणि प्रत्यक्ष शिवरायांच्या आगमनाचा देखावा साकारून या सुंदर सांस्कृतिक संध्येची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी दुपारी ‘अमृतातेही पैजा जिंके’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.
‘साहित्यातून मराठीचे संवर्धन होत असून मराठी भाषा हे संवादाचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे ती अधिकाधिक वापरली पाहिजे. विद्यापीठाने मराठी भाषेशी संबंधित वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करून तिचा गोडवा जपलाय. शासकीय व्यवहारात तर मराठी भाषा वापरली जातेच, पण सामान्य व्यवहारातही तीचा अधिकाधिक वापर करून तिचे संवर्धन व्हायला हवे’, असे मत नागपूर येथील सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय कुळकर्णी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.निळकंठ नरवाडे, प्रा.हेमराज निखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण म्हणाले, आपण मुलांना आजची गरज म्हणून इंग्रजी शाळेत घालत असलो तरी मराठी भाषा ही आपली मायमराठी असल्यामुळे आपल्या मुलांना ती अस्खलितपणे बोलता आणि लिहिता यायला हवी, असे मत मांडले.
वक्त्यांचा परिचय सहा.प्रा.अमोल चव्हाण यांनी करून दिला. प्रास्ताविक विभाग प्रमुख निळकंठ नरवाडे यांनी केले. संचालन सहा.प्रा.डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
































