Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीच्या बॅाम्ब पथकाला राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात 2 पदके

गडचिरोलीच्या बॅाम्ब पथकाला राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात 2 पदके

घातपातविरोधी तपासणीत तृतीय क्रमांक

पदक विजेत्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना पोलीस अधीक्षक एम.रमेश

गडचिरोली : पुणे येथे आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाने दोन पदकं पटकावली. घातपातविरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च व रुम सर्च या दोन्ही उपप्रकारात कास्य पदक पटकावले. घातपातविरोधी तपासणीमध्ये गडचिराली परिक्षेत्राला तिसरा क्रमांक मिळाला असून अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता या पथकाची निवड करण्यात आली आहे.

पोलिसांचे व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा या मेळाव्यामागील उद्देश असते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या अनुषंगाने दिनांक 5 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पुणे येथे 21 व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये गडचिरोली पोलीस दलातील बीडीडीएस पथकासह एकूण 26 वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. विविध स्पर्धेमध्ये लेखी व तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आल्या. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले.

यामध्ये घातपातविरोधी तपासणी या स्पर्धेमध्ये गडचिरोली पोलीस दलातर्फे बॅाम्ब शोधक नाशक पथकातील (बीडीडीएस) हवालदार पंकज हुलके व अंमलदार धम्मदीप मेश्राम यांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेतील ग्राउंड सर्च व रुम सर्च या दोन्ही उपप्रकारात गडचिरोली पोलीस दलाचे बीडीडीएस पथकाला दोन कास्यपदके प्राप्त झाली आहेत. यासोबतच सहा दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये गडचिराली परिक्षेत्राला घातपातविरोधी तपासणीमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

सदर टीमची अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता निवड झाली आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेले बीडीडीएस शाखेतील पोहवा पंकज हुलके व अंमलदार धम्मदीप मेश्राम यांचे पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.