गडचिरोली : जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्याच्या काळात नाले व ओढे प्रवाहित होत असल्याने मार्ग अडून अडचणी निर्माण होतात. अशातच नेलगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेलगुंडा गावाजवळील नाल्यामुळे वाहतूकीचा मार्ग बंद होत असल्याने नेलगुंडा ठाण्यासह एसआरपीएफच्या जवानांनी नागरिकांच्या सुविधेसाठी श्रमदानातून पुलाची उभारणी केली. यात नागरिकांनीही श्रमदान करत हातभार लावला.
नेलगुंडा गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण होऊन नेहमी इतर गावांशी संपर्क तुटत असतो. यामुळे वैद्यकीय मदत आणि शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानादरम्यान योग्य बंदोबस्त लाऊन नेलगुंडा ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तसेच एसआरपीएफच्या अंमलदारांनी श्रमदानातून एक नवीन पूल तयार केला. त्यामुळे येथील नागरिकांचे पुलावरुन येणे जाणे सुखकर झाले.
गडचिरोली पोलिसांच्या या समाजभिमुख कार्यामुळे नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबध्द आहे हे या उपक्रमाव्दारे अधोरेखित झाले आहे.
सदर उपक्रम पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट कुंभार, नेलगुंडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि.अजिंक्य इथापे तसेच एसआरपीएफचे पोउपनि.मोराणकर व पोलीस अंमलदारांनी राबवविला.
































