Home क्राईम दोन ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्रात एका तरुणीसह दोन तरुणांना अटक

दोन ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्रात एका तरुणीसह दोन तरुणांना अटक

कागदपत्रे इतरांना देताना सावधान !

गडचिरोली : सध्या सोशल मीडियावरील बनावट जाहिराती आणि इतरांच्या नावे बँक खाती उघडून त्याद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशाच दोन ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी एका स्थानिक तरुणीसह छत्तीसगड आणि राजस्थानमधील दोन तरुणांना अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली येथे शिक्षण घेणा­ऱ्या एका 25 वर्षीय युवतीची 4 जून 2026 रोजी केदारनाथ येथील सहलीदरम्यान गडचिरोली येथील एका 22 वर्षीय युवतीशी ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री होऊन फिर्यादी युवतीने आपल्या सहा मैत्रिणींशी ओळख करून दिली. दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी आरोपी युवतीने आपले बँक खाते होल्ड झाल्याचे सांगून ट्रेडिंग करण्याकरिता सर्व मैत्रिणींच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडून देण्याची विनंती केली. विश्वास ठेवून मैत्रिणी तयार झाल्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये तिने त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावे नवीन सीमकार्ड खरेदी केले, तसेच त्यांच्या नावे बँक खाती उघडून सीमकार्ड बँक खात्यांशी लिंक केले. त्या खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड व सीमकार्ड स्वतःसोबत घेऊन गेली.

दरम्यान 6 ऑक्टोबर 2026 रोजी फिर्यादी युवतीच्या खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याबाबतची नोटीस घरी बँकेकडून आली. सर्व मैत्रिणींनी बँकेत जाऊन खात्यांची पडताळणी केली असता, सातही खात्यांमध्ये मिळून सुमारे 1 कोटी 4 लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

आपल्या परवानगीशिवाय खात्यांचा वापर करून विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी युवतीने 9 ऑक्टोबर 2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनला त्या युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी जुही विनायक मेश्राम (23 वर्षे), रा.आशिर्वाद नगर, गडचिरोली हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तीने पुणे येथील तिचा मित्र सात्विक दिपक सावडिया (22 वर्षे), रा.रायगड (छत्तीसगड) याने तिला ट्रेडींगकरीता सात बँक खाती मिळविण्यास सांगितले होते अशी माहिती दिली. त्यानुसार तिने गडचिरोली येथील 7 मुलींना खोटे सांगून महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा गडचिरोली येथे खाते काढून सदर सातही बँकेचे पासबुक, एटीएम, पीन, पासवर्ड हे आरोपी मित्र सात्विक यास दिल्याचे सांगितले. सदर माहितीच्या आधारे शोध घेऊन सात्विक सावडीया याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम कोठून आली व पुढे कुठे वर्ग झाली, याबाबत पुढील तपास पोनि.विनोद चव्हाण करीत आहेत.

दुस­ऱ्या प्रकरणात, 17 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादीने फेसबुकवर ‘Sajja Handloom’ नावाची बेडशीट विक्रीची जाहिरात पाहून व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला व एका बेडशीटसाठी 550 रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘PP Collection AC Comfuter set Bedsheets’ या नावाची आणखी एक जाहिरात पाहून तीन बेडशीटसाठी 1,000 रुपये पाठविले. अशा प्रकारे एकूण 1,550 रुपये पाठवूनही ऑर्डर केल्यानंतर बेडशीट मिळाल्या नाही. संबंधित दुकानाच्या मूळ मालकाशी संपर्क केला असता त्यांच्या दुकानाच्या नावाचा वापर करून अज्ञात व्यक्ती ऑनलाईन फसवणूक करीत असल्याचे समोर आले.

गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून पथकाला राजस्थानमध्ये पाठवून आरोपी साहिल जमशेद उर्फ साहिल जमशेद खान (25 वर्ष), रा.सोमका, जि.डीग (राजस्थान) याला अटक करण्यात आली. या आरोपीने आणखी किती नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली, फसवणुकीची रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली, तसेच गुन्ह्यात वापरलेली फेसबुक खाती, मोबाईल, सिमकार्ड व या नेटवर्कमधील इतर साथीदारांबाबत पुढील तपास पोउपनि.प्रविण बुंदे करीत आहे.

नागरिकांनी दक्ष असावे, पोलिसांचे आवाहन

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि.1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सायबर सुरक्षा जनजागृती महिना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे. याच जनजागृतीमुळे जागरुक झालेल्या नागरिकांनी सायबर फसवणुकीसंदर्भात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. मात्र सोशल मीडियावर अतिशय कमी किमतीत वस्तू विक्रीच्या जाहिराती पाहून अनोळखी व्यक्तीच्या यूपीआय आयडी किंवा बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत; खरेदीपूर्वी विक्रेत्याची विश्वासार्हता पडताळून घ्यावी. तसेच ओळखीच्या किंवा मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरूनही आपल्या नावे बँक खाते उघडू देऊ नये आणि आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, सिमकार्ड व वैयक्तिक कागदपत्रे इतर कोणाच्याही वापरासाठी देऊ नये. अशा खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमध्ये होत असून त्याची कायदेशीर जबाबदारी खातेधारकावरही येऊ शकते. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.