Home दैनंदिन बातम्या सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी अधीक्षिकेचे निलंबन

सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी अधीक्षिकेचे निलंबन

मंत्री अशोक उईके यांचे भेटीनंतर निर्देश

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या रानू कृष्णा हलामी या 14 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच केलेल्या आत्महत्येनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी मंगळवारी कुरखेडा गाठले. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे, तसेच संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना अनुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ.उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने ती घरी जाण्याचा आग्रह करत असताना अधीक्षिकेने तिला खोलीत बंद केल्याचा पालकांचा आरोप आहे. मंत्री उईके यांनी पालकांचे म्हणने ऐकून घेतले. मृत मुलीच्या आईला आश्रमशाळेत नोकरी व निवासाची सोय करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मंत्र्‍यांशी चर्चा केली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासह संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी, जिल्हा संघटक ताहीर शेख, माकपाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आझाद समाज पार्टीचे विनोद मडावी, अंकुश कोकोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ.उईके यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेच्या अनुषंगाने संबंधितांची जबाबदारी तपासून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही डॉ. उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. आश्रमशाळांतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिकांशी नियमित संवाद व संपर्क ठेवून शाळा आणि वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घ्यावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ.उईके यांनी दिला.

यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम., माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी व संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.