

चामोर्शी : धान पीकाला शेवटच्या टप्प्यातील पाण्याची गरज असताना रोज बराच वेळ वीज पुरवठा खंडीत राहात असल्याने पीकाला पाणी देणे अशक्य होत आहे. ही समस्या तातडीने दूर करून अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि.13) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अतुल गण्यारपवार यांनी दिला.
सध्या धानाच्या पीकाला अखेरच्या टप्प्यातील पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी काही भागातील जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हाताशी आलेले धानाचे पीक पाण्याअभावी वाया जाते की काय, अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. अशा स्थितीत वैनगंगा नदी, सिंचन प्रकल्प आणि सिंचन विहिरींच्या माध्यमातून ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून पीकांना वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र वीज कंपनीकडून गावाचे आणि शेतीचे फिडर वेगळे करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक तास वीज पुरवठा खंडीत ठेवला जात आहे. यासोबत लोडशेडींगही केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
वास्तविक राज्यातील इतर जिल्ह्यातील एका तालुक्याला जेवढी वीज लागते तेवढी वीज संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला पुरेसी आहे. असे असताना जिल्ह्यात भारनियमन का केले जात आहे? असा सवाल अतुल गण्यारपवार यांनी केला आहे. याशिवाय वीज पुरवठा बंद ठेवून केले जाणारे फिडर वेगळे करण्याचे काम आताच करण्याऐवजी धानपीक निघाल्यानंतर करावे, म्हणजे शेतकऱ्यांना पीकांना पाणी देण्याची अडचण निर्माण होणार नाही, अशी मागणी गण्यारपवार यांनी केली आहे.
यासंदर्भात संबंधितांना निवेदने देऊनही फरक पडला नसल्यामुळे अखेर शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) वतीने चामोर्शीतील मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात परिसरातील 70 गावातील महिला-पुरूषांनी सहभाग घेतल्याचे अमोल गण्यारपवार यांनी सांगितले.
पाणी असूनही शेतापर्यंत पोहोचतच नाही
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठ्याबाबत तातडीने निर्णय घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, सोबतच गणपूर-येणापूर परिसरातील हळदी माल येथील उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीला मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. चामोर्शी येथील चिचडोह बॅरेजचे पाणी नियमित सोडले जात नसल्याने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच शेतसारा भरूनही कन्नमवार जलाशय, रेगडी येथील पाणी टोकावरील सगणापूर, एकोडी, वेलतुर तुकुम, वाघोली, मोहोर्ली व इतर गावातील शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याच्या तकारी अनेक शेतकन्यांकडून येत आहेत.
शेतकन्यांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि दोन दिवसांत शेतीपंपांना 24 तास नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा उपविभागीय अधिकारी (महसूल) चामोर्शी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गण्यारपवार यांनी दिला.
या चक्काजाम आंदोलनात अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात प्रेमानंद मल्लिक (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी). अमोल गण्यारपवार (नगरसेवक, नगरपंचायत चामोर्शी), सुरेश पाटील परसोडे, सुधाकर निखाडे, गोसावी सातपुते (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती), याशिवाय राष्ट्रवादी (एसपी)चे पदाधिकारी राजू आत्राम, नरेंद्र जुवारे, करण गण्यारपवार, गुरदास पाटील चौधरी, मधुकर चिंतलवार, विनोद शेंगर, बाबुराव भोवरे, सुरेश नैताम, पुंजाराम वासेकर, मेघराज वैद्य, सुधाकर गद्दे, रमेश भसारकर, लवरू बोदेलकर, पत्रू सातपुते आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.
मुलचेरा-अहेरीतही शेतकऱ्यांचा रोष
यासोबत मुलचेरा, अहेरी तालुक्यातही नियमित वीज पुरवठ्याअभावी शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळाले नसल्याची नाराजी कायम असतानाच, मुलचेरा आणि अहेरी तालुक्यांत वीज समस्येने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुंदरनगर, श्रीरामपूर, गोविंदपूर, हरिनगर, गोमणी, किष्टापूर, नवेगाव आणि वेलगूर परिसरात वारंवार वीज खंडित होणे आणि कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. धानपीक कापणीच्या तोंडावर असताना पाण्याअभावी उभे पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेक शेतांमध्ये सिंचनाअभावी जमिनीला भेगा पडत आहे.
































