Home पब्लिक प्रॉब्लेम ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत द्या

‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत द्या

मा.खा.नेते यांची शासनाकडे शिफारस

चंद्रपूर : चालू वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात अपुऱ्या व अल्प पर्जन्यमानामुळे तलावं आणि विविध जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर खालावला आहे. परिणामी, तलावांमधील मत्स्यबीज व मत्स्यसंपदेचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून मच्छीमारांच्या रोजीरोटीचा व उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत माजी खासदार डॅा.अशोक नेते यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून नुकसानग्रस्त संस्था व मच्छीमार बांधवांना विशेष आर्थिक मदत देण्याबाबत शिफारस केली आहे.

ढिवर व भोई समाजाचे नेते स्वप्निल अलगदेवे आणि समाजाचे सल्लागार दिवाकर गेडाम यांनी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेत मा.खासदार डॉ.नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

तलावांमधील पाणीटंचाईमुळे मच्छीमार संकटात

चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 165 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून असलेले हजारो मच्छीमार कुटुंबे वास्तव्य करतात. यंदाच्या मान्सूनमध्ये अपेक्षित पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील जलसाठे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच, कमी पावसामुळे तलावाकाठची शेती करपत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी तलावाचे पाणी सोडणे भाग पडले. यातून तलावांमधील पाणी वेळेआधीच आटून मत्स्यबीज व मत्स्यसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी मच्छीमार बांधवांना अवाजवी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

शिष्टमंडळाने मांडल्या समस्या

ढिवर-भोई समाजाच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना स्वतंत्र पत्र पाठवून तातडीने ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या

* चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाच्या नुकसानाची तातडीने पाहणी करून पंचनामे व नुकसानाचे मूल्यमापन करण्यात यावे.
* प्रचलित निकषांनुसार चंद्रपूर जिल्ह्यात तातडीने ‘मत्स्य दुष्काळ’ घोषित करण्यात यावा.
* नुकसानग्रस्त मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व मच्छीमार कुटुंबांना तात्काळ विशेष आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी.
* सिंचनासाठी तलावातून पाणी सोडल्यामुळे मत्स्यबीज व मत्स्यसंवर्धनाला झालेल्या नुकसानाची नियमानुसार भरपाई द्यावी.
* मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेसाठी विशेष सहाय्य योजना राबवून व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यासाठी मदत करावी.
* मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने ठोस निर्णय घेण्यात यावा.

जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांचे सहकार्य अपेक्षित

माजी खासदार डॉ.नेते यांनी या मु्द्द्यावर केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासनाकडे या विषयाचा एकत्रित व प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सेवा सहकारी संस्थांनी आपापल्या पातळीवर वरील मुद्यांचा समावेश असलेले प्रस्ताव तयार करून संबंधित प्रशासनाकडे तातडीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.