Home दैनंदिन बातम्या लवकरच आरमोरीपर्यंत धावणार गोंदिया-चांदाफोर्ट प्रवासी रेल्वेगाडी

लवकरच आरमोरीपर्यंत धावणार गोंदिया-चांदाफोर्ट प्रवासी रेल्वेगाडी

आरमोरीकरांच्या रेल्वेसेवेच्या स्वप्नाला बळ

देसाईगंज : गोंदिया ते वडसा आणि वडसा ते चांदाफोर्ट (चंद्रपूर) या दोन मेमू रेल्वेगाड्यांचा विस्तार आरमोरी रेल्वेस्थानकापर्यंत करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. रेल्वे बोर्डाने 10 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे. त्यामुळे आरमोरीकरांची रेल्वेसेवेची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. (खाली वाचा)

आरमोरी परिसरातील नागरिकांना रेल्वेसेवेची सुविधा उपलब्ध व्हावी, ही मागणी अनेक दिवसांपासून विविध स्तरांवर मांडली जात होती. वडसा ते आरमोरीपर्यंत रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि रेल्वेमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून ही रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांसह व्यापारी, नोकरदार, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारी ही रेल्वेसेवा महत्त्वाची होती. अखेर दोन मेमू गाड्यांच्या विस्ताराला मंजुरी मिळाल्याने आरमोरीकरांच्या रेल्वेसेवेच्या स्वप्नाला बळ मिळाले आहे.

माजी खासदार अशोक नेते यांनी वडसा ते गडचिरोली या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली होती. वनविभागाचे अडथळे पार करत हा मार्ग आरमोरीपर्यंत पूर्ण झाला. गडचिरोलीपर्यंतच्या पुढील मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.

आरमोरीपर्यंत रेल्वे धावण्यास मंजुरी दिल्याबद्दल माजी आमदार गजबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार व्यक्त केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यामुळे आरमोरीच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रात्री येणार सकाळी चांदाफोर्टकडे रवाना

रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनुसार, गाडी क्रमांक 68806 गोंदिया–वडसा मेमू आरमोरीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. ही गाडी गोंदिया येथून सायंकाळी 7.10 वाजता सुटून रात्री 9.30 वाजता वडसा येथे पोहोचेल. त्यानंतर रात्री 9.35 वाजता वडसा येथून रवाना होऊन रात्री 10 वाजता आरमोरी रेल्वेस्थानकावर दाखल होईल.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 68808 वडसा–चांदाफोर्ट मेमू ही आरमोरीपासून सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी सकाळी 6.30 वाजता आरमोरी येथून सुटेल. सकाळी 7.05 वाजता वडसा येथे पोहोचल्यानंतर 7.15 वाजता चांदाफोर्टच्या दिशेने रवाना होईल आणि सकाळी 9.55 वाजता चांदाफोर्ट येथे पोहोचेल.

रेल्वे बोर्डाने या दोन्ही गाड्यांच्या विस्ताराला मंजुरी देताना शक्य तितक्या लवकर सोयीस्कर तारखेपासून सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, प्रत्यक्ष रेल्वेसेवा सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.