अहेरी : नगरोत्थान योजनेतील विद्युत कामांची बिले मिळाल्यानंतर कंत्राटदाराला तीन लाख रुपयांची लाच मागून त्यातील 1 लाख 20 हजार रुपये प्रत्यक्ष घेताना नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कंत्राटदाराच्या तक्रारीवरून गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहेरीत सापळा रचून गुरूवारी (दि.15) ही कारवाई केली. गुडेल्लीवार हे अहेरी नगरपंचायतमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहे. या कारवाईने अहेरीत एकच खळबळ उडाली आहे. (खाली वाचा)

बिलातील 15 टक्के मला द्या
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे 33 वर्षीय परवानाधारक विद्युत कंत्राटदार आहे. तसेच अहेरी येथे त्यांचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकानही आहे. त्यांना आणि त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना सन 2025-26 अंतर्गत अहेरीतील प्रभाग क्रमांक 1 ते 10 आणि प्रभाग क्रमांक 11 ते 17 मध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याची कामे मिळाली होती. या दोन्ही कामांची एकूण मंजूर निविदा रक्कम 19 लाख 87 हजार 765 रुपये होती. दोन्ही कामे निर्धारित 180 दिवसांच्या मुदतीत पूर्ण झाली आणि त्यांची संपूर्ण बिलेही अदा झाली.
त्यानंतर गुडेल्लीवार यांनी तक्रारदारांच्या दुकानात येऊन, नगरोत्थान योजनेतील ही कामे जिल्हा नियोजन समितीतून मी स्वतः मंजूर करून आणली आणि ती आपल्या कोट्यातील असल्याचा दावा केला. त्याचा मोबदला म्हणून बिलाच्या रकमेच्या 15 टक्क्यांप्रमाणे तीन लाख रुपये देण्याची मागणी वारंवार तक्रारदाराकडे केल्याचा आरोप आहे.
आधी 30 हजार; त्यानंतरही पैशांसाठी तगादा
तक्रारीनुसार, वारंवार होणाऱ्या मागणीमुळे तक्रारदारांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी गुडेल्लीवार यांना 30 हजार रुपये रोख दिले होते. त्यानंतरही व्हॉट्सॲप कॉलद्वारे उर्वरित 2 लाख 70 हजार रुपयांची मागणी सुरू होती. आणखी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पंचांसमक्ष मागणीची पडताळणी
तक्रारीच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर रोजी विभागाने लाच मागणीची पडताळणी केली. तक्रारदारांना पंच आणि ध्वनिमुद्रकासह गुडेल्लीवार यांच्या हार्डवेअर दुकानात पाठविण्यात आले. त्यावेळी गुडेलीवार यांनी उर्वरित 2 लाख 70 हजार रुपयांची मागणी करून, सध्या जमतील तेवढे पैसे आणून देण्यास सांगितले. तक्रारदारांनी आपल्याकडे सध्या 1 लाख 20 हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगून ती रक्कम आणून दिली. ते पैसे स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
गुडेल्लीवार यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
































