Home दैनंदिन बातम्या चामोर्शीत शेतकऱ्यांचा महामार्गावरच मुक्काम, रस्त्यावर पंगती अन् विश्रांती

चामोर्शीत शेतकऱ्यांचा महामार्गावरच मुक्काम, रस्त्यावर पंगती अन् विश्रांती

तहसीलदारांची पाठ, एसडीओंचा दूरसंवाद

रात्री सामुहिक पंगतीत जेवण करून आंदोलकांनी रस्त्यावरच अशी विश्रांती घेतली
दुपारी भर उन्हात शेतकरी असे रस्त्यावर ठाण मांडून बसले होते

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातल्या 14 गावांमधील शेतकऱ्यांनी कालपासून चामोर्शीच्या मुख्य चौकात सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आजही कायम आहे. या शेतकऱ्यांनी रात्री रस्त्यालगत स्वयंपाक करून आंदोलनस्थळीच जेवण आणि मुक्कामही केला. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महसूल यंत्रणेच्या वतीने कोणीही आंदोलनस्थळी आलेले नव्हते. तहसीलदार प्रशांत घोरुडे हे आंदोलनास्थळाकडे फिरकलेही नाही, तर एसडीओंनी फोनवरून चर्चा केली. मात्र शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. (खाली वाचा)

प्रस्तावित प्रकल्पांसाठी एमआयडीसीला आपल्या शेतजमिनी देण्यास या शेतकऱ्यांचा विरोध आहे. जमिनींच्या अधिग्रहणासंदर्भात पुन्हा नोटीस मिळणे सुरू झाल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांनी गुरूवारी (दि.15) दुपारी 12.30 पासून चामोर्शीच्या मुख्य चौकात ठाण मांडून राष्ट्रीय महामार्ग अडवला आहे.

जेएसडब्ल्यूच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी भेंडाळा परिसरातील 14 गावांमधील नागरिकांना नोटीस मिळाल्यानंतर 4 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभूतपूर्व ठिय्या आंदोलन झाले होते. त्यानंतर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मध्यस्थीनंतर आक्षेप घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना 90 दिवसांची मुदत प्रशासनाने वाढवून दिली होती. यासोबतच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणल्यानंतरच जमिनींच्या अधिग्रहणासंदर्भात अंतिम निर्णय होईल, असेही स्पष्ट केले होते. पण तशी बैठक अद्याप झालेली नसताना शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नोटीस मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी, नंतरच पुढील प्रक्रियेबाबत ठरवावे, अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने मनोज पोरते यांनी सांगितले. त्यासाठी हे शेतकरी चक्काजाम आंदोलनावर बसले आहेत.