Home दैनंदिन बातम्या येनापूर-आष्टीत शेतकऱ्यांनी केला राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’

येनापूर-आष्टीत शेतकऱ्यांनी केला राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’

आंदोलकांना भडकविले जाते- जयस्वाल

आष्टीतील आंबेडकर चौकात ठिय्या देऊन बसलेले आंदोलक शेतकरी
येनापूर येथे रस्त्यावर बसून चक्काजाम करताना आंदोलक

चामोर्शी : एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. सोमवारी (दि.2) येनापूर येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंदोलकांनी आष्टी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले. येनापूरपासून आष्टीपर्यंत आंदोलनाची धग पोहोचल्याने जमीन अधिग्रहणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी आंदोलकांना विरोधकांकडून भडकविले जात असल्याचा आरोप केला. जमिनी अधिग्रहणासंदर्भात कोणत्याही हालचाली सुरू नसताना हे आंदोलन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.

गणपूर, जयरामपूर आणि मुधोली परिसरातील जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलकांनी सोमवारी येनापूर येथे रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे येनापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बसेस, ट्रकसह अन्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका जात असल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी स्ता मोकळा करून रुग्णवाहिकेला मार्ग दिला.

आष्टी येथे अपर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी बंद पुकारला होता. याचवेळी एमआयडीसी भूसंपादनाविरोधात शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यामुळे आष्टी येथे गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी येनापूर येथेच रस्ता अडविला. त्यामुळे येनापूर, गणपूर व मुधोली परिसरातील एमआयडीसी भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांनीही दुपारी 12:30 वाजता येनापूर येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करून शेतजमीन अधिग्रहणाविरोधात असंतोष व्यक्त केला.

आंदोलकांना भडकविले जात आहे

दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना विचारले असता शेतकऱ्यांना विरोधक भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही पुढचे पाऊल उचलणार नाही, हे मी आधीच सांगितलेले असताना आता हे आंदोलन करण्याची काहीच गरज नाही, असेही अॅड.जयस्वाल म्हणाले.