Home क्राईम छत्तीसगडमधून आलेले 1.20 कोटींचे अंमली पदार्थ नेमके कुठे जात होते?

छत्तीसगडमधून आलेले 1.20 कोटींचे अंमली पदार्थ नेमके कुठे जात होते?

बीडच्या दोघांसह 6 छत्तीसगडींना अटक

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे 240 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. पेंढरी (कारवाफा) उपविभागाअंतर्गत येणार्‍या गट्टा (फु) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत तीन चारचाकी वाहने आणि 8 मोबाईल जप्त करून 8 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात 6 जण छत्तीसगडमधील, तर दोघे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे या ड्रग पुरवठ्याचे कनेक्शन बीड जिल्ह्यापर्यंत आहे का, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग नेमके कुठे जात होते, याचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.

सविस्तर असे की, पोमके गट्टा (फु) येथील पोलीस अधिकारी व अंमलदार नाकाबंदी करीत असताना संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. नाकाबंदीदरम्यान पांढ­ऱ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन (सी.जी 26 के 2149) या वाहनाला थांबवून वाहनाची तपासणी करत असताना वाहनातील 3 इसम उडवा-उडवीची उत्तरे देत होते. पोलीस पथकाने त्यांची कसून चौकशी केली असता ते अवैध अंमली पदार्थ वाहतूकीसाठी पायलटींग करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पाठीमागे त्यांचे इतर तीन सहकारी हे पिकअप वाहनातून अंमली पदार्थाची वाहतूक करण्याकरीता येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या एका चारचाकी वाहनातून अंमली पदार्थाची खरेदी करण्याकरीता बीड जिल्ह्यातील आष्टीचे दोघे थांबलेले आहेत असेही पोलिसांना समजले.

गट्टा येथील पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठही संशयीतांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून 12 चुंगळ्यांमध्ये असलेले अंमली पदार्थ मिळून आले. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून एकूण 240.580 किलोग्रॅम अंमली पदार्थ (अंदाजे किंमत 1,20,29,000 रुपये), तसेच चारचाकी वाहन (सी.जी. 04 एम.जी. 0730), पिकअप वाहन (सी.जी. 26 इ 5475), स्कार्पियो वाहन (सी.जी. 26 के 2149), 8 मोबाईल असा एकूण रुपये 1 कोटी 46 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आठही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास स्था.गु.शाखेचे सपोनि कपिल आगलावे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. कपिल आगलावे व पोलीस पथक, तसेच पोमकेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.दयानंद भोंबे व अंमलदार यांनी पार पाडली.