Home दैनंदिन बातम्या खरीप हंगामातील 326 गावांची सुधारित पैसेवारी 50 पैशाच्या आत

खरीप हंगामातील 326 गावांची सुधारित पैसेवारी 50 पैशाच्या आत

1247 गावांमध्ये पैसेवारी जास्त

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप पिकाची सुधारित पैसेवारी तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जाहीर करण्यात आली आहे. त्यात 1623 गावांपैकी 326 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पैसेवारी 50 पैशाच्या आत आली आहे. 1247 गावांमध्ये मात्र पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आली असून त्या गावांमधील पीक स्थिती बऱ्यापैकी चांगली असल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरीप पिकांची गावे 1623 आहेत. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरिप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 4 आहे. त्यापैकी खरीप गावांमध्ये पीक नसलेली गावे 54 आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अनियमित पाऊस झाल्याने अनेक भागातील पीकांची स्थिती समाधानकारक नाही. प्रशासनाच्या सर्व्हेक्षणानुसार 50 पैशाच्या आत पैसेवारी असलेली गावे 326 आहेत. अर्थात त्या गावांमधील शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पिकांची सरासरी स्थिती पाहता खरीप हंगाम 2026-27 या वर्षाची सुधारित पैसेवारी 0.63 आहे, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.