Home दैनंदिन बातम्या गुरुनानक जयंतीनिमित्त गुरूद्वारात मा.खा.अशोक नेते यांनी घेतले दर्शन

गुरुनानक जयंतीनिमित्त गुरूद्वारात मा.खा.अशोक नेते यांनी घेतले दर्शन

गुरुद्वारा समितीकडून भावपूर्ण सत्कार

गडचिरोली : शीख धर्माचे संस्थापक, मानवतेचा संदेश देणारे महान संत गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील गोकुळ नगर परिसरातील लंगर साहेब गुरुद्वारात, तसेच किसान नगर येथील गुरुद्वारात माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॅा.अशोक नेते यांनी दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली. किसाननगर येथील रक्तदान शिबिरालाही त्यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.

‘बोले सो निहाल’च्या जयघोषात त्यांनी उपस्थित शीख बांधव, गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी व भाविकांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. गुरु नानक देवजी यांच्या विचारांचे स्मरण करत मानवता, समानता, बंधुभाव, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश आजच्या समाजासाठी तितकाच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सर्वधर्मीयांनी परस्पर आदर, प्रेम आणि एकोपा जपत समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे, हीच गुरु नानक देवजी यांच्या शिकवणीची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी गुरुद्वारा समितीच्या वतीने डॉ.अशोक नेते यांचा शाल, पिवळा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंगलसिंग पटवा, सुनीलसिंग पटवा, राजेंद्रसिंग प्रधानी, गुरुमानसिंग, गुरुदेवसिंग प्रधानी यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शीख बांधव, भाविक उपस्थित होते.

डॅा.नेते यांनी सावली तालुक्यातील किसान नगर येथील श्री गुरुनानक शाही गुरुद्वारातही दर्शन घेतले. गुरुद्वारा सेवा समिती किसाननगरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गुरुपर्वासारख्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून समितीने राबविलेला हा सेवाभावी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा बांधकामासाठी आवश्यक ते प्रयत्न करून शक्य ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी पामी सलोजा, संजय मजोके, योगेश गलगट, शैलेश मजोके, प्रदीप सुरे, मुकेश बिके यांच्यासह अनेक शीख बांधव, भगिनी व भाविक उपस्थित होते. यावेळी गुरुद्वारा सेवा समितीच्या वतीने डॉ.नेते यांचा सन्मान करण्यात आला.