Home दैनंदिन बातम्या शेतकऱ्यांवरील संकट दूर होवो; आ.धर्मरावबाबा आत्राम यांची प्रार्थना

शेतकऱ्यांवरील संकट दूर होवो; आ.धर्मरावबाबा आत्राम यांची प्रार्थना

बाबा ताजुद्दीन दर्ग्यात घेतले दर्शन

गडचिरोली : राज्यातील शेतकरी बांधवांवरील दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतीला सुगीचे दिवस यावे, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशा सदिच्छेने आमदार तथा माजी मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी सोमवारी नागपूरच्या प्रसिद्ध हजरत बाबा ताजुद्दीन औलिया दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रद्धेने चादर अर्पण करून मनोभावे दुआ मागितली.

नागपूरमधील ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते. या दर्ग्याला मोठी आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विविध धर्मांचे भाविक येथे श्रद्धेने नतमस्तक होऊन आपापल्या मनोकामना व्यक्त करतात.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची हजरत बाबा ताजुद्दीन यांच्यावर विशेष श्रद्धा असून ते दरवर्षी नित्यनेमाने या दर्ग्यात दर्शनासाठी येत असतात. यंदाही त्यांनी दर्ग्यात दर्शन घेऊन समाजाच्या सर्व घटकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. विशेषतः सध्या शेतीसमोर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस यावेत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दर्शनानंतर ताजबागचे सेक्रेटरी राजा भैय्या यांनी धर्मरावबाबा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शशांकसिंह राजपूत, अब्दुल तौफिक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.